महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रामलल्लाच्या जयघोषात मुंबईतून पहिली "आस्था ट्रेन" अयोध्येला रवाना

Aastha Special Train : मुंबईहून ‘आस्था ट्रेन’ अयोध्येला (Mumbai to Ayodhya Train) सोमवारी रात्री (5 फेब्रुवारी) रवाना झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून 'आस्था ट्रेन'ला हिरवा झेंडा दाखवला.

Aastha Special Train
आस्था ट्रेन

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 6, 2024, 9:53 AM IST

मुंबई Aastha Special Train : अयोध्येला प्रभू रामाचं मंदिर (Ram Mandir Ayodhya) उभारल्यानंतर देशात भक्तिमय वातावरण निर्माण झालंय. देशभरातील रामभक्त आता अयोध्येला दर्शनासाठी येत आहेत. अशातच प्रभू श्रीरामाच्या जयघोषात भक्तिमय वातावरणात 'आस्था ट्रेन' मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 5 फेब्रुवारीला रात्री अयोध्येला रवाना झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते 'आस्था ट्रेन'ला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, भाजपाचे अनेक नेते उपस्थित होते.

कलंकाचा ढाचा खाली आणला : यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "अयोध्येत राम मंदिर झाल्यानंतर तिथे जाणारे सर्व लोक हे फार भाग्यशाली आहेत. कारण त्यांना आता प्रभू रामाचं दर्शन घेता येणार आहे. मला अयोध्येला जाणाऱ्या सर्व राम भक्तांचा हेवा वाटतो. कारण त्यांना प्रभू रामाचं दर्शन हे माझ्याआधी घेता येणार आहे. यासाठी पाचशे वर्षे आपण जे स्वप्न बघितलं, शेकडो लढाया लढलो. आज त्याच ठिकाणी रामलल्ला स्थापित झाले आहेत. कलंकाचा ढाचा हा ६ डिसेंबर १९९२ रोजी खाली आणला आणि रामलल्लाची मूर्ती आपण त्याठिकाणी स्थापित केली आहे."

कुठलाही पुरावा त्याठिकाणी नाही : फडणवीस पुढे म्हणाले की, "आम्ही आज सर्व काँक्रीटच्या घरात राहतो आणि आपलं आराध्य दैवत मातीच्या घरात राहते. त्यामुळं आमचा सर्वांचा एकच नारा होता 'रामलल्ला हम आयेंगे, भव्य मंदिर बनायेंगे...' मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आभार मानतो कारण त्यांच्यामुळं हे स्वप्न पूर्ण झालं. रामलल्लाची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली असून ती मूर्ती पाहिल्यानंतर प्रत्यक्षात प्रभू रामाची अनुभूती येते. ती मूर्ती म्हणजे १४० करोड जनतेच्या आशा आणि आकांक्षाची पूर्ती आहे."

प्रभू रामाचा कुठलाही पुरावा नाही :"काही लोक आम्हाला प्रश्न विचारतात तुम्ही काय केले? त्या सर्व लोकांना माझा प्रश्न आहे की, जेव्हा २००८ साली न्यायालयामध्ये त्यावेळच्या केंद्र सरकारला विचारलं होतं की, या ठिकाणी मंदिर होते असं केंद्र सरकारचे मत आहे का? तेव्हा केंद्र सरकारनं असं सांगितलं होतं की, प्रभू रामाचा जन्म अयोध्येत झाला याचा कुठलाही पुरावा त्याठिकाणी नाही. तशा प्रकारचे एफिडेविट त्यांनी न्यायालयात दाखल केलं होतं. इतकेच नाही तर २०११ साली याच सर्व लोकांनी न्यायालयात दुसरं एफिडेविट दाखल केले की, रामसेतू हा काल्पनिक आहे. रामसेतू नावाची अशी कुठलीही गोष्ट नाही. परंतु नरेंद्र मोदी सरकारने ठामपणे मंदिर इथेच आहे. याच ठिकाणी मंदिराचे अवशेषसुद्धा मिळाले आहेत आणि हीच प्रभू रामाची जन्मभूमी आहे असं त्यांना ठणकावून सांगितलं होतं," असं म्हणत फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

मोदी सरकारमुळं हे शक्य : "नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत याच ठिकाणी मंदिर बांधायचं आहे असं सांगितलं होतं. त्यामुळंच सर्वोच्च न्यायालयाचा असा निर्णय आला. काहीजण म्हणतात की, हे सर्वोच्च न्यायालयामुळं झालं आहे. पण मोदी सरकार नसते तर हे सर्व होऊ शकलं नसतं," असंही फडणवीस म्हणाले.

मुंबईमध्ये फेक रामभक्त : फडणवीस पुढे म्हणाले की, "मुंबईमध्ये काहीजण फेक रामभक्त फिरत आहेत. ते जोरजोरात मोठमोठ्यानं भाषणं करत आहेत. स्वतःला रामभक्त म्हणून सांगत आहेत. इतकेच नाही तर बाबरी आम्हीच तोडली असंही सांगत आहेत. तर हे तेच लोक आहेत जेव्हा त ढाचा खाली आला तेव्हा हे सर्व आपल्या घरामध्ये घाबरून लपून बसले होते. हे लोक आम्हाला आता शिकवायला लागले आहेत. कलंकाचा ढाचा आम्ही खाली आणला याचा आम्हाला अभिमान आहे. आता त्या ठिकाणी मंदिर तयार झाले. आता तुम्ही त्या मंदिराकडं कूच करत आहात."

हेही वाचा -

  1. मुंबईवरून अयोध्येला निघालेली शबनम अमेठीत पोहोचली, फतव्यावरून केलं मोठं वक्तव्य
  2. रामलल्लांच्या डोक्यावर सजणार तब्बल 11 कोटींचा हिऱ्यांचा मुकुट, राम मंदिरात भेटवस्तूंचा ढीग
  3. अनोखा रामभक्त; दररोज 500 वेळा लिहतो रामनाम, आतापर्यंत 50 लाख वेळा 'राम' लिहिल्याचा दावा

ABOUT THE AUTHOR

...view details