मुंबई-मंत्रालयातील प्रवेशाबाबत एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. मंत्रालयात राज्यातील विविध भागातील म्हणजे गावखेड्यातून लोक आपल्या कामासाठी येतात. मात्र त्यांच्या कामासाठी तासनतास रांगेत थांबावे लागते. रांगेत थांबूनसुद्धा अनेकांचे काम होत नाही. मात्र आता मंत्रालयातील प्रवेशासाठी चेहरा दाखवूनच मंत्रालयात प्रवेश मिळणार आहे. एफआरएस या नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मंत्रालयात प्रवेश मिळणार असून, मंत्रालयातील कर्मचारी, अधिकारी, लोकप्रतिनिधींचे सचिव यांचा चेहरा दाखवूनच प्रवेश मिळणार आहे. जानेवारीच्या अंतिम आठवड्यापासून ही प्रणाली सुरू झालीय.
10,500 कर्मचाऱ्यांचा डेटा :मंत्रालयात दररोज हजारो लोक येतात, यामुळे सुरक्षा यंत्रणावरती मोठ्या प्रमाणात ताण येतो. दरम्यान, मंत्रालयातील कामकाजात सुलभता आणि पारदर्शकता यावी, यासाठी ही अद्ययावत प्रणाली आणलीय. मंत्रालयातल्या अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधींचे सचिव आदींचे मिळून 10 हजार 500 डेटा याची नोंदणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे या सर्वांचा मंत्रालयात प्रवेश आता फेशियल रिकग्नायझेशन सिस्टीमद्वारे तसेच एफआरएसद्वारे होणार आहे. याशिवाय अभ्यागतांना आणि क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना डीजी प्रवेश ॲपद्वारे ऑनलाइन मंत्रालयात प्रवेश देण्यात येणार आहे.
सुरक्षा यंत्रणेवरील ताण कमी होणार : दुसरीकडे मंत्रालयात एफआरएस ही अद्ययावत प्रणाली बसवण्यात आल्यामुळे जे अनधिकृत प्रवेश होत होते, त्याला चाप बसणार आहे. तसेच ज्या लांबच लांब रांगा लागत होत्या, त्यासुद्धा आता आटोक्यात येणार आहेत. विशेष म्हणजे मंत्रालयातील सुरक्षा यंत्रणांवर मोठ्या प्रमाणात ताण येत होता. परंतु आता या एफआरएस प्रणालीमुळे सुरक्षा यंत्रणेवरील ताण कमी होणार आहे. मंत्रालयातील कामात पारदर्शकता आणि सुलभता येणार असल्याचे बोललं जातंय. दुसरीकडे या प्रणालीमुळे अजूनही काही कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या डेटाची नोंद न झाल्यामुळे त्यांना मंत्रालयात प्रवेश मिळताना त्रास होतोय. फेस रीडिंग न झाल्यामुळे अनेकांना प्रवेश मिळत नाही. मात्र या प्रणालीमुळे फेस रीडिंग होऊनच प्रवेश मिळणार असल्यामुळे मंत्रालयात येणाऱ्याची गर्दी कमी होईल आणि काम ही जलदगतीने होईल, अशी आशा व्यक्त केली जातेय.
हेही वाचाः