मुंबई Ajit Pawar Election Campaign :निवडणूक म्हटलं की साम दाम दंड भेद यांचा वापर अनेकदा झाल्याचं दिसून आलं आहे. त्यातच काही ठिकाणी मंत्रतंत्र किंवा अंद्धश्रद्धेला खतपाणी घालणारे प्रकारही पाहायला मिळाले आहेत. मात्र पुरोगामी महाराष्ट्रात या सगळ्याला नेहमीच विरोध होत आला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात अलिकडेच असा काही प्रकार दिसून आल्यानं सगळीकडेच संतापाची लाट आली आहे. अजित पवार यांच्या कार्यकर्त्यानं कोपरा सभेत मडकं फोडल्यानं त्याची चर्चा राज्यात रंगली आहे. वास्तविक बारामतीच्या लढतीकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. कारणही तसंच आहे. पवार कुटुंबातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनेत्रा पवार यांच्यात थेट लढत नाही. तर ती लढत राजकारणातील चाणक्य ज्येष्ठ नेते शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्थात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्तित्वाची बनली आहे. त्यामुळे काका-पुतणे बारामतीत तळ ठोकून आहेत. त्यातच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकाऱ्याने सभेत मडकं फोडल्यानं बारामती मतदार संघातील राजकीय वातावरण तापलं आहे. निवडणूक प्रचारात अशा प्रकारे मडकं फोडल्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राच्या परंपरेला न शोभणारी कृती असल्यामुळे सगळ्याच स्तरातून टीका होताना दिसत आहे.
नेमका काय घडला प्रकार :बारामती लोकसभा मतदारसंघातील सुनेत्रा पवार यांच्या माळेगाव प्रचारसभेत रविराज तावरे यांनी लोकांसमोर मडकं फोडलं. असं करत असताना सुनेत्रा पवार विजयी झाल्या नाही तर पाणीप्रश्न निर्माण होईल. रविराज तावरे हा अजित पवार यांच्या नेतृखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी असल्याचं समोर येतं आहे. याबाबत रविराज तावरे यांनी आपण मडकं फोडलं नाही तर माठ म्हणेज कलश फोडल्याचं म्हटलं आहे. उलट आपलं आयुष्य पवार साहेबांना लागो असं रविराज तावरे यांनी म्हटलं आहे.
निवडणुकीत आणाभाकांची परंपरा -राज्यात अनेकदा असे प्रकार दिसून आले आहेत की, कुलदैवताच्या नावानं शपथ घ्यायला लावून मतदान करण्याचं साकडं घातलं जातं. गंडे-दोरेही बांधले जातात. एका निवडणुकीत कोकणात तर एका महिला उमेदवाराने त्यांच्या घरापासून ठराविक अंतरावर लिंबू पेरल्याचं सांगितलं होतं. निवडणूक जिंकण्यासाठी अशा क्लृप्त्या अनेकदा कार्यकर्ते आणि काहीवेळा नेते करत असतात. मात्र यातून अंद्धश्रद्धेला खतपाणी मिळतं. त्याला पुरोगामी महाराष्ट्रात नेहमीच विरोध होत आला आहे.
वाण नाही पण गुण लागला - हेमंत देसाई :महाराष्ट्र हा शाहू, फुले, आंबेडकर यांचा आहे, अशा प्रकारचा जप केला जातो; मात्र अनेक राजकीय पक्ष अंधश्रद्धा जोपासत असतात हे संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलं आहे. जादूटोणाविरोधी कायदा मंजूर व्हावा यासाठी नरेंद्र दाभोलकर यांची अंधश्रद्धा निर्मूलन समिती आग्रही होती. त्यावेळेस या कायद्याविरोधात वेगवेगळ्या भ्रामक समजुती पसरवण्याचं काम अनेक राजकीय पक्षाकडून झालं. त्याचा परिणाम विधेयकाला विरोध करण्यात झाला. खूप प्रयत्नानंतर विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर झालं. कायदा संमत झाला. प्रत्यक्षात मात्र अनेक बाबतीत महाराष्ट्रात या कायद्याची अंमलबजावणी होते का? याकडे बघितलं जात नाही. प्रचार सभेतून मडकं फोडणं हा प्रकार धक्कादायक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कायमच पुरोगामी विचारांचा पुरस्कार आणि प्रसार केलेला आहे. ते स्वतः शाहू, फुले, आंबेडकरांचे फक्त नाव घेतच नाहीत, तर त्यांच्या कृतीतून देखील जाणवतंं. त्यांनी कधीही अंधश्रद्धेचा पुरस्कार केला नाही. अशाप्रकारे मडकं फोडणं म्हणजे एक अंधश्रद्धा आहे, असे विचार ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी मांडले.