ठाणे Cricket Match Issue : ठाण्यातील दादोजी कोंडदेव मैदानावर आयएसपीएल टेनिस क्रिकेट स्पर्धेचं 6 मार्च ते 15 मार्च दरम्यान आयोजन करण्यात आलं होत. मात्र या स्पर्धेच्या अंतिम सामन्यावेळी झालेल्या गोंधळामुळं पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. यात काहीजण जखमी झाले आहेत.
अंतिम सामन्यात क्रिकेटप्रेमेंची मोठी गर्दी : शुक्रवारी या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी मुंबई आणि कोलकत्ता क्रिकेट संघात अंतिम सामना होता. हा सामना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. तिकीट असतानाही या ठिकाणी प्रमाणाबाहेर गर्दी झाली होती. त्यातच अनेक प्रेक्षक विनातिकीट दादोजी कोंडदेव मैदानात घुसण्याचा प्रयत्न करत होते. या मैदानाच्या गेट क्रमांक तिनवर क्रिकेटप्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. याचा विपरित परिणाम होऊन प्रेक्षकांनी गेट तोडून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. यात लहान मुलं आणि त्यांचे पालक पडले. या गर्दीत धक्काबुक्कीमध्ये लहान मुलं आपल्या आई, वडिलांपासून दूर झाले होते. तसंच काही क्रिकेटप्रेमी महिला प्रेक्षकही जखमी झाल्या. आयएसपीएलच्या ढिसाळ नियोजनामुळं क्रिकेट प्रेक्षकांना धक्काबुकीच्या गर्दीचा त्रास सहन करावा लागला. यामुळं गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनाही सौम्य लाठीचार्ज करावा लागला.