नाशिक Coriander rate hike :नाशिक जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. अशातच पेठ-गुजरात मार्गावर आदिवासी संघटनेनं पुकारलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळं आणि सोमवारी श्रीकृष्ण जयंती असल्यानं कोथिंबिरीचे भाव गगनाला भिडले आहेत. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोथिंबिरीची आवक घटल्यानं कोथिंबिरीचा बाजारभाव 260 रुपये प्रति जुडी होता. तसंच इतर भाज्यांचेही दर वाढल्यानं महिला ग्राहकांचं आर्थिक बजेट कोलमडलं आहे.
नाशिक जिल्ह्यात चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना पिकांची काढणी करताना अडचणी येत आहेत. त्यामुळं बाजारपेठेत शेतमालाची आवक काही प्रमाणात कमी झाली आहे. बाजार समितीतून गुजरात राज्यात दैनंदिन पाठवल्या जाणाऱ्या कोथिंबीर मालाची रवानगी काही प्रमाणात होत आहे. पेसा भरती प्रकरणावरून आदिवासी संघटना आक्रमक झाल्या असून पेठ-गुजरात महामार्ग रास्ता रोको आंदोलन सुरू आहे, त्यामुळं काही प्रमाणात वाहतूक ठप्प झाली आहे, त्यातच पावसाचा परिणाम झाला आहे.
श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा परिणाम : गुजरातमध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे नाशिकमधून कोथिंबिरीला मोठी मागणी असते, मात्र बाजारात कोथिंबिरीचा पुरवठा कमी झाल्यानं कोथिंबिरीच्या दरात वाढ झाली आहे. नाशिकच्या किरकोळ बाजारात ग्राहकांना 180 ते 220 रुपये दरानं कोथिंबिरीची जुडी खरेदी करावी लागत आहे. पुढील काही दिवस बाजारभाव वाढत राहतील, असंही व्यापाऱ्यांनी सांगितलं.
जुडीला 260 रुपये भाव : नाशिक बाजार समितीमध्ये कोथिंबिरीचा बाजारभाव यंदा 26 हजार रुपये प्रति शेकडा असल्याचं बाजार समितीनं सांगितलं. शुक्रवारी सायंकाळी एका शेतकऱ्यानं आणलेल्या कोथिंबिरीच्या जुडीला 260 रुपये भाव मिळाला. या शेतकऱ्यानं अंदाजे 250 ते 300 जुड्या विक्रीसाठी आणल्या होत्या.
हेही वाचा
- कष्टाचे झाले चीज! अहमदनगरच्या शेतकऱ्याची मेहनत फळाला, डाळिंब पोहोचली थेट मलेशियात! - Pomegranate Farmer Success Story
- बिबट्याच्या हल्ल्यात गुराखी ठार; गायी चारायला गेला अन् परतलाच नाही, नागरिक हादरले - Youth Died In Leopard Attack
- प्रशिक्षण न घेता जोपासला कलेचा छंद : मालदाडमधील विद्यार्थ्यानं बनवल्या आकर्षक मूर्ती - Attractive sculpture