मुंबई Congress demands 45 seats Vidarbha :- नोव्हेंबर महिन्यात अपेक्षित असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली असून, महाराष्ट्रात विभागवार बैठकांचा दौरा सुरू झाला आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. विशेष म्हणजे विदर्भात भाजपाची मोठ्या प्रमाणात पिछेहाट झाली होती. या अनुषंगाने भाजपाने विदर्भात कुठल्याही परिस्थितीत विजय संपादन करण्यासाठी रणनीती आखायला सुरुवात केली आहे. आताच झालेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विदर्भ दौऱ्यात त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचं काम केलं असून, भाजपाने विदर्भात "मिशन 45" टार्गेट ठेवलं आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी विदर्भात ४५ जागांची मागणी केल्याने उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून कलगीतुरा रंगला आहे.
विदर्भात काँग्रेसचा दबदबा : १७ व्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीने घवघवीत यश संपादन केलं. यात काँग्रेसने विदर्भात मोठ्या प्रमाणात आघाडी घेत विजय मिळवला. पूर्व विदर्भात तर काँग्रेसने ५ पैकी ४ जागांवर विजय संपादन करत महायुतीला विशेष करून भाजपाला मोठा धक्का दिला. या कारणाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या आत्मविश्वास दुणावला असून, विदर्भात जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा मानस काँग्रेसने केला आहे. विदर्भातील ४५ जागांवर काँग्रेस विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे.
विदर्भात विधानसभेच्या एकूण ६२ जागा: २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाला ६२ पैकी २९ जागी विजय संपादन करता आला होता. काँग्रेस १५ तर राष्ट्रवादी काँग्रेसने ६ जागांवर विजय मिळवला होता. यानंतर विदर्भात झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातसुद्धा भाजपाचा पराभव झाला होता. आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला विदर्भात मोठा फटका बसला असून, पूर्व विदर्भात ५ पैकी नागपूर सोडून सर्व जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. पश्चिम विदर्भातील यवतमाळ - वाशिम, अमरावती जागासुद्धा महाविकास आघाडीने जिंकली. या कारणामुळे विदर्भात काँग्रेसचा आलेख मोठ्या प्रमाणामध्ये वाढला असून, भाजपासाठी ही धोक्याची घंटा आहे.
विदर्भापाठोपाठ मुंबईतही रस्सीखेच :काँग्रेसने विदर्भात ४५ जागांची मागणी केली असल्याने तसे झाल्यास विदर्भातील इतर १७ जागांवर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या गटाला सामावून घ्यावे लागणार आहे. पण ही शक्यता फार कमी आहे. उद्धव ठाकरे गटाकडून विदर्भात २० ते २२ जागांची मागणी होत असल्याने काँग्रेसला ते ४५ जागा देतील, अशी शक्यताही फार कमी आहे. तर दुसरीकडे काँग्रेसला जर शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांची साथ लाभली, तर काँग्रेसचा विदर्भातील विजय अधिक सुखर होऊ शकतो हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना पटवून देण्याचे काम काँग्रेस पक्षश्रेष्ठीकडून केलं जात आहे. दुसरीकडे मुंबईतील जागावाटपावरूनसुद्धा काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. मुंबईतील एकूण ३६ जागांपैकी १८ ते २० जागांवर उद्धव ठाकरे गट तर काँग्रेस १३ ते १४ जागा, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट ३ ते ४ जागांवर लढणार आहे. याबरोबरच समाजवादी पक्षालासुद्धा १ ते २ जागा दिल्या जाणार आहेत. एकंदरीत यापैकी ३० ते ३१ जागांवर महाविकास आघाडीत जागा वाटत निश्चित झाले असून, ५ ते ६ जागांवर मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू आहे. काँग्रेसला विदर्भाप्रमाणे मुंबईतसुद्धा जास्त जागा हव्या आहेत. वर्सोवा आणि भायखळा या दोन जागांवरून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटात जुंपली आहे.
विदर्भात काँग्रेस सर्वाधिक जागा जिंकेल : विदर्भातील एकूण विधानसभेच्या जागांसंदर्भात बोलताना राजकीय विश्लेषक जयंत माईणकर म्हणाले आहेत की, विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. आता झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने विदर्भात महायुतीला चारीमुंड्या चीत केलं. विशेष करून भाजपासाठी हा फार मोठा धक्का आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय विदर्भात आहे. उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विदर्भातील आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे विदर्भातील आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हेसुद्धा विदर्भातील असून, या सर्वांसाठी विदर्भ जिंकणं फार महत्त्वाचं आहे. दुसरीकडे या निवडणुकीत काँग्रेस राज्यात ज्या काही ८० ते ८५ जागा जिंकणार आहे, त्यापैकी निम्म्या जागा काँग्रेस विदर्भातून जिंकणार असल्याचा दावाही जयंत माईणकर यांनी केला आहे. त्यामुळेच विदर्भातून कुठल्याही परिस्थितीमध्ये काँग्रेस सर्वाधिक जागा लढवू इच्छित असल्याचे वावगे ठरणार नाही. खरं तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनीही हे समजून घ्यायला हवे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी विदर्भ निर्णायक ठरणार आहे.