मुंबई BJP Vs Congress:काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' महाराष्ट्रात प्रवेश करण्यापूर्वी महाराष्ट्रातील महत्त्वाचे काँग्रेसचे नेते आणि संबंधित विभागातील काही माजी मंत्री यांना भाजपाने आपल्या पार्टीत सामावून घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांनी महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस त्याला अपवाद आहे, असं सांगितलं जात होतं; मात्र काँग्रेसच्या बड्या नेत्यांना गळाला लावत भाजपाने काँग्रेसचा हा दावाही फोल ठरवला.
काय आहे भाजपाचा डाव? :यासंदर्भात काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांना विचारले असता ते म्हणाले की, महाराष्ट्रात काँग्रेस हा एकमेव असा पक्ष आहे जो भाजपाला पूर्ण ताकदीनिशी शह देऊ शकतो. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आमच्यातील काही नाराज तर काही विविध प्रकरणांमध्ये अडकलेल्या नेत्यांना भाजपाने लक्ष्य केले. वास्तविक काँग्रेसलाही कमकुवत करण्याचा भाजपाचा डाव आहे.
काय साधते भाजपा मुहूर्त ? :काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'चे मुख्य समन्वयक म्हणून काम करत होते. राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'ला देशभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. राहुल गांधी यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' यशस्वी होऊ नये किंवा त्याला लोकांचा प्रतिसाद मिळू नये म्हणून महाराष्ट्रात ही यात्रा दाखल होण्यापूर्वी त्यांनी अशोक चव्हाण यांनाच दबाव टाकून आपल्या पक्षात घेतले. त्यानंतर ही यात्रा मुंबईत येईल आणि महाराष्ट्रातील मुंबईतील जनता निश्चितच त्यांचे स्वागत करील ही भीती असल्यानं त्यांनी मुंबईतील माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा आणि बाबा सिद्दिकी यांना आपल्या पक्षात घेतले.
भाजपाला योग्य तो जबाब देऊ :मुंबईचे काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम हेसुद्धा भाजपाच्या वाटेवर आहेत असे विचारले असता लोंढे म्हणाले की, "कुणीही कुणाचीही भेट घेऊ शकतो; परंतु संजय निरुपम हे भाजपात जातील असं मला सध्या तरी वाटत नाही. तसेच राहुल गांधी यांची यात्रा नंदुरबार येथे आल्यानंतर त्यांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळणार याची खात्रीच होती. म्हणून त्याला काही अंशी छेद देण्यासाठी आमचे नेते आणि माजी मंत्री पद्माकर वळवी यांना त्यांनी पक्षात घाईघाईने घेतले आहे. परंतु, काही डागाळलेले नेते आणि काही निष्क्रिय नेते त्यांनी आपल्या पक्षात घेतले असले तरी राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'ला काहीही फरक पडत नाही. आम्हाला महाराष्ट्रातील जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो आहे. नेते गेले म्हणून कार्यकर्ते गेले नाहीत. ते आमच्या सोबत कायम आहेत. त्यामुळे काँग्रेस काहीही झाले तरी डगमगणार नाही. भाजपाला योग्य तो जबाब देईलच," असा इशाराही लोंढे यांनी दिला.