मुंबई Sanjay Nirupam : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेस नेते संजय निरुपम उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र, महाविकास आघाडीकडून (ठाकरे गटानं) या मतदारसंघात उमेदवार दिल्यानं संजय निरुपम नाराज झाले आहेत. त्यामुळं त्यांनी थेट पक्षाला अल्टिमेटम दिलाय. संजय निरुपम काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. तसंच ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळं संजय निरुपम यांच्याविरोधात मोठा निर्णय घेण्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत दिले आहेत.
आजच्या बैठकीत रणनीती : लोकसभा निवडणूक देश, संविधानासाठी महत्त्वाची आहे. देशातील केंद्र सरकार हटवण्याची भूमिका घेऊन आम्ही महाविकास आघाडी म्हणून रणनीती तयार केली आहे. विविध विषय, रणनीती, प्रचार कसा करायचा यावर आज चर्चा झाली. आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन जनतेसमोर जाणार आहोत. आमचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मणिपूर ते मुंबई भारत जोडो न्याय यात्रेतून लोकांपर्यंत पोहोचलो आहोत. आम्ही लोकांच्या समस्या समजून घेतल्या. घरोघरी जाऊन 25 मुद्द्यांवर आम्ही फेकूगिरी, जुमलाबाज लोकांना सत्तेवरून हटवून लोकशाही निर्माण करण्याचा निर्धार केला आहे, असं नाना पटोले म्हणाले. भाजपानं काँग्रेस पक्षाचा हमी शब्द चोरल्याचा आरोप देखील पटोले यांनी केला आहे. काँग्रेसचे सरकार येताच जीएसटी रद्द करण्याचा प्रस्ताव राहुल गांधींनी मांडला आहे. विदर्भातील पाचही लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केलाय. निवडणुकीच्या पुढच्या टप्प्यातही हेच चित्र पाहायला मिळणार आहे. जनता लोकसभा निवडणूक स्वत:च्या हातात घेणार असल्याचं दिसतंय, असं पटोले यांनी म्हटलंय.
संजय निरुपम यांचं नाव हटवलं :आम्ही काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून संजय निरुपम यांचं नाव काढून टाकलं आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. त्यांनी कोणत्या पक्षात तसंच कुठं जावं हा त्यांचा निर्णय आहे, असंही पटोले म्हणाले. संजय निरुपम सुपारी घेऊन वक्तव्य करीत असून त्यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईला सुरवात झालीय. आज रात्री त्यांच्याविषयी निर्णय घेतला जाईल, असं नाना पटोले यांनी सांगितलं. त्यांना कोणतीही नोटीस देणार नसून ऑन द स्पॉट कारवाई करणार असल्याचंही पटोले म्हणाले.