मुंबई Ashok Chavan Resigned :काँग्रेसला मोठा धक्का बसणारी बातमी समोर आलीय. महाराष्ट्राचेमाजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचं प्राथमिक सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिलाय. त्यांनी आज सकाळी 11.24 वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडं आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलाय. 'ईटीव्ही भारत'च्या हाती अशोक चव्हाणांचं राजीनामा पत्र लागलं आहे.
भाजपाकडून राज्यसभेवर जाऊ शकतात : अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडं सुपुर्द केलाय. ते भाजपाकडून राज्यसभेवर जाऊ शकतात, असं बोललं जातंय. तसेच त्यांच्यासोबत 10 ते 12 आमदारही पक्ष बदलू शकतात. महाराष्ट्र काँग्रेसचे दोन ज्येष्ठ नेते, बाबा सिद्दीकी आणि मिलिंद देवरा यांनी काही दिवसांपूर्वीच पक्षाला रामराम केला होता. त्यानंतर आता अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानं काँग्रेसला मोठा धक्का बसलाय.
देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य : अशोक चव्हाण यांच्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मी मीडियाकडून अशोक चव्हाण यांच्याबद्दल ऐकलं. पण सध्या मी एवढेच सांगू शकतो की काँग्रेसचे अनेक मोठे नेते भाजपाच्या संपर्कात आहेत. जनतेशी जोडलेल्या नेत्यांची काँग्रेसमध्ये घुसमट झाल्याचं जाणवत आहे. मला खात्री आहे की काँग्रेसमधील काही मोठे चेहरे भाजपात सामील होतील."