अमरावती - राज्यातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ केल्याची घोषणा या सरकारनं केली. आता घोषणा केली असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गायब झालेत. शेतकऱ्यांनी कर्ज 31 मार्चच्या आत भरलं नाही तर त्यांना सहा टक्के व्याजमाफी मिळणार नाही. सहा टक्के व्याजमाफी मिळाली नाही तर शेतकऱ्यांना पुढच्या वर्षी कर्जच मिळणार नाही. हे वास्तव असताना आता आर्थिक परिस्थिती चांगली नाही असं कारण दिलं जात असून चार-पाच महिने तरी कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळणार नाही असं सरकारकडून बोललं जातय. हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप प्रहार पक्षाचे प्रमुख आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी केला तर इथून पुढे मोठ्या पक्षांना मतदान करू नका असं आव्हान करत काँग्रेस गद्दार तर भाजपा महा गद्दार असल्याचा आरोप राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी केला. अमरावतीत मेंढपाळांच्या मोर्चाला या दोन्ही नेत्यांनी संबोधित करताना शासनावर टीकास्त्र सोडले.
विभागीय आयुक्तालयावर धडकला मोर्चा- राज्यातील मेंढपाळांना त्यांच्या जनावरांसाठी चराईक्षेत्र नाही. चारा मुबलक उपलब्ध असतानाही जनावरांना तो मिळू दिला जात नाही. वनविभागाचे कठोर कायदे मेंढपाळांना त्रासदायक असून मेंढपाळांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात मंगळवारी बच्चू कडू आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख तथा माजी मंत्री महादेव जानकर यांच्या नेतृत्वात मेंढपाळांचा मोर्चा अमरावती विभागीय कार्यालयावर धडकला. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर विभागीय कार्यालय परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता.