अमरावती Comrades Marathon: अमरावती येथील दिलीप पाटील यांनी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे पार पडलेल्या 'कॉम्रेड मॅरेथॉन' स्पर्धेत तब्बल आठ वेळा पार केल्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. धावण्याच्या स्पर्धेतील अतिशय कठीण समजली जाणारी 'कॉम्रेड मॅरेथॉन' स्पर्धा डर्बन येथे ९ जुन रोजी पार पडली. स्पर्धेसाठी देशभरातून हजारो स्पर्धकांसोबत अमरावती जिल्ह्यातील सहा धावपटूंनी सलग ११ तास धावत ९० किलोमिटरचे अंतर पार केलं. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रशिक्षक दिलीप पाटील यांच्यासह दीपमाला साळुंखे-बद्रे, पोलीस निरिक्षक अनिल कुरळकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता मंगेश पाटील, पोलीस कर्मचारी राजेश कोचे, पोलीस निरीक्षक सतिश उमरे यांनी अमरावतीचा झेंडा सातासमुद्रापार गाडला.
१२ तासात ९० किलोमीटर अंतर:दक्षिण अफ्रिकेतील डर्बन आणि पीटर मरीडसबर्ग या दोन शहरादरम्यान या स्पर्धेचं आयोजन करण्यात येते. सर्व टप्पे ठराविक वेळेत स्पर्धकांना पूर्ण करावे लागतात. पदक जिंकण्यासाठी ९० किलोमीटर अंतर १२ तासांत पूर्ण करण्याचं टार्गेट असतं. यावर्षी संपूर्ण भारतामधून ३२३ धावपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यापैकी सहा धावपटू अमरावतीचे आहेत. २०२३ मध्ये या स्पर्धेत अमरावती येथील दिलीप पाटील आणि दीपमाला साळुंखे- बद्रे असे दोन जण सहभागी झाले होते. परंतू यावर्षी पहिल्यांदाच अमरावती सारख्या लहान शहरांमधून कॉम्रेड मॅरेथॉनसाठी सहा जण सहभागी झाले होते.