नाशिक :जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून तापमानाचा पारा 10 अंशांपर्यंत खाली आलाय. सकाळी सात वाजता शाळेत जाताना लहान मुलांचे हाल होत आहेत, यासंदर्भात नाशिक महापालिका शिक्षण विभागाने विद्यार्थीचे आरोग्य लक्षात घेता महापालिकेच्या सर्व शाळा एक तास उशिराने म्हणजे सकाळी सातऐवजी आठ वाजता भरवण्याचे आदेश जारी केलेत. या निर्णयाचे विद्यार्थ्यांसोबतच पालकांनीदेखील कौतुक केलंय.
सकाळी वातावरणात धुके : नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून सकाळी आणि रात्री तापमानाचा पारा 10 ते 8 अंशांपर्यंत खाली येतोय. तसेच सकाळी वातावरणात धुके असल्याने स्कूल व्हॅन आणि बस चालकांना वाहन चालवणे कठीण झालंय. अशातच थंडीमुळे विद्यार्थी आजारी पडत असून, वर्गातील पटसंख्यादेखील कमी दिसून येतेय. मुलांना झोपेतून उठवण्यापासून त्यांना व्हॅनपर्यंत नेण्यासाठी पालकांनादेखील धावपळ करावी लागत आहे. अनेक विद्यार्थी झोपेतून उठण्यास कंटाळा करीत असल्याने मुलांच्या आईंना त्यांना समजून सांगण्यासाठी कसरत करावी लागतेय. नाशिक महापालिका शिक्षणाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या 100 शाळा तसेच खासगी शाळा उशिरा भरवण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे आता शाळा सात ऐवजी आठ वाजता भरण्यास सुरुवात झालीय. या निर्णयाचे विद्यार्थी तसेच पालकांनी कौतुक केलंय.
गारव्यामुळे मुलांना सर्दी, खोकला यांसारखा त्रास :गेल्या आठ ते दहा दिवसांपासून नाशिकमध्ये थंडी वाढलीय, अशात मुलांना सकाळी सात वाजता शाळेत जाण्यासाठी किमान एक ते दीड तास आधी उठावे लागत आहे. थंडी जास्त असल्याने मुलंदेखील अंथरुणातून उठण्यास कंटाळा करीत आहेत. तसेच गारव्यामुळे मुलांना सर्दी, खोकला यांसारखा त्रास देखील जाणवतोय. त्यामुळे आता एक तास उशिराने शाळा भरणार असून, मुलांच्या दृष्टीने हा चांगला निर्णय घेतलाय, असं एका मुलाच्या आईने सांगितलंय.
चांगली झोप मिळणार :एवढ्या थंडीत सकाळी उठवत नाही, या थंडीचा त्रास देखील होतो. दप्तरासोबत स्वेटर, हॅन्ड ग्लोज, कानटोपी, मास्क या सर्व गोष्टी शाळेत घेऊन जावं लागतं. वर्गातील मुलांना थंडी वाजते, त्यामुळे अभ्यासाकडे लक्ष लागत नाही. आता शाळेचे वेळापत्रक बदलले असून, एक तास उशिराने शाळा भरत आहे. त्यामुळे चांगली झोप मिळणार आहे, असं एका विद्यार्थिनींनी सांगितलंय. थंडी वाढल्याने वातावरणात गारवा वाढलाय. तसेच सकाळी रस्त्यावर दाट धुके असते, अशात वाहन चालवणेदेखील कठीण होतेय, त्यामुळे दरवर्षी थंडीच्या दिवसात शाळेची वेळ बदलायला हवी, असं व्हॅन चालक संघटनेचे अध्यक्ष अजीम सय्यद यांनी सांगितलंय.
हेही वाचा :
- 'विधानसभेची निवडणूकच बोगस': संजय राऊतांचा हल्लाबोल; शरद पवारांवरील पडळकरांच्या टीकेला दिलं जोरदार प्रत्युत्तर
- बांगलादेशात मंदिरांसह हिंदूंवर हल्ले ; पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाहांना हिंदू केवळ मतांसाठी हवाय, संजय राऊत यांचा सरकारवर निशाणा