महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोस्टल रोडचं लोकार्पण; काय आहे कोस्टल रोडची खासियत?

Coastal Road Inauguration Today : मुंबईतल्या बहुचर्चित कोस्टल रोडचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झालं. यामुळं आता वरळी ते मरीन ड्राईव्ह हे अंतर अवघ्या 10 मिनिटांत पार करता येणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोस्टल रोडचं लोकार्पण; काय आहेत कोस्टल रोडची वैशिष्ये?
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोस्टल रोडचं लोकार्पण; काय आहेत कोस्टल रोडची वैशिष्ये?

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 11, 2024, 11:09 AM IST

मुंबईCoastal Road Inauguration Today: मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी तसंच मुंबईकरांसह देशासाठी उत्सुकतेचा केंद्रबिंदू असलेल्या मुंबईच्या वरळी ते मरीन ड्राईव्ह कोस्टल रोडच्या एका मार्गिकेचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज लोकार्पण झालंय. या सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार उपस्थित आहेत. वरळी लोकसभा मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार अरविंद सावंत यांनादेखील उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आलंय.

महाराष्ट्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प : मुंबई महापालिकेचा महत्त्वकांक्षी प्रकल्पानं दक्षिण मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. 29 किलोमीटरचा मुंबई ते कांदिवली असा हा मार्ग असणार आहे. मुंबई शहरात दररोज शेकडोच्या संख्येनं वाहन येतात. त्यामुळं वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन वाहन चालकांसोबत प्रवाशांनाही डोकेदुखी ठरतेय. मुंबई शहरातील दक्षिण भागात याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. मुंबई दक्षिण टोकापासून म्हणजेच नरिमन पॉईंट दहिसर विरारपर्यंत वेगानं प्रवास करता यावा, यासाठी कोस्टल रोडची संकल्पना पुढं आली. पहिल्या टप्प्यातील प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सीलिंग 10.58 किलोमीटरच्या कोस्टल रोड निर्माण करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेच्या वतीनं घेण्यात आला. प्रकल्पाभोवती 320 एकरवर सेंट्रल पार्क उभारण्यात येणार आहे. या कोस्टल रोडमुळे दक्षिण मुंबई ही उत्तर मुंबईला जोडली जाणार आहे.

86 टक्के काम पूर्ण-2018 पासून सुरू झालेला हा प्रकल्प नोव्हेंबर 2023 साली पूर्णत्वास जाणं अपेक्षित होतं. मात्र, स्थानिक मच्छीमार बांधवांकडून दोन पिलरमधील अंतरावरुन आंदोलनं करण्यात आली. दोन पिलरमधील अंतर 60 मिटर होते. ते अंतर 120 मीटरपर्यंत वाढवलं जावं, अशा प्रकारची मागणी मच्छीमार बांधवांकडून करण्यात आली होती. ती मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्ण केल्यानं कोस्टल रोडच्या कामाला गती प्राप्त झाली. त्या अनुषंगानं ते अधूनमधून प्रकल्पाला भेटी देत होते. कोस्टल रोड प्रकल्पाचं 86 टक्के काम पूर्ण झाल्यामुळं सध्या एकच मार्गिका प्रवासासाठी खुली केली जाणार आहे.




कोस्टल रोड शनिवार आणि रविवार राहणार बंद : धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मार्ग अर्थात कोस्टल रोड मुंबईकरांना आजपासून एका मार्गिकेवरुन प्रवास करता येणार आहे. बिंदू माधव ठाकरे जंक्शन ते मरीन ड्राईव्ह अर्थात प्रिन्सेस ट्रीट ब्रिज दक्षिण भागातील दिशेनं सुरू करण्यात येईल. कोस्टल रोडचा वापर सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत करता येणार आहे. तसंच सोमवार ते शुक्रवार पर्यंत प्रवासासाठी कोस्टल रोड खुला असणार आहे. मात्र, शनिवार आणि रविवारी प्रकल्पाच्या कामासाठी हा बंद राहणार आहे. अवजड वाहनं, ट्रेलर, मिक्सर, ट्रॅक्टर आणि मालवाहक सर्व वाहनांना परवानगी नाही. मात्र एसटी आणि बेस्ट बससह प्रवासी वाहनांना परवानगी राहणार आहे. तसंच दुचाकी अपंग व्यक्तींची दुचाकी तीन चाकी, टांगा हातगाड्या आणि पायी चालणाऱ्यांना परवानगी राहणार आहे.


नो फोटो सेशन :कोस्टल रोडवर प्रवास करताना कमाल वेग 80 किलोमीटर प्रतितास असणार आहे. तर बोगद्यात 60 किलोमीटर प्रति तास वेगमर्यादा देण्यात आलीय. तर वळण, प्रवेश आणि एक्झिट पॉईंटवर 40 किलोमीटर प्रति तास असणार आहे. प्रवासादरम्यान गाडी उभी करुन किंवा गाडी रस्त्यात थांबून फोटोसेशन किंवा व्हिडिओ काढण्या, सक्त मनाई राहणार आहे.


इंधनाची आणि वेळेची बचत : या कोस्टल रोडमुळं प्रवासात 70 टक्के वेळेची बचत होणार असून ध्वनी प्रदूषण आणि वायु प्रदूषण कमी होण्यासही मदत होणार आहे. वरळी ते मरीन ड्राईव्ह असा प्रवास करण्यासाठी सध्या 40 ते 50 मिनिटं लागतात. मात्र, कोस्टल रोडमुळं हा प्रवास दहा मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. प्रकल्पाला 12,721 कोटी रुपये खर्च आलाय. कोस्टल रोडला समांतर असा 7.5 किलोमीटर लांबीचा फुटपाद बांधला जाईल. तसंच सायकल ट्रक देखील असणार आहे. फुलपाखरु उद्यान आणि मैदान विकसित केली जाणार असून त्यात लहान मुलांसाठी खेळाचं साहित्य उपलब्ध करण्यात येणार आहेत.

हेही वाचा :

  1. कोस्टल रोडचं 95 टक्के काम पूर्ण, लवकरच उद्घाटन होणार; कोस्टल रोडच्या पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांची माहिती
  2. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे? 4 हजार कोटींचा वाटा उचलण्यास एमएमआरडीएचा मुंबई महानगरपालिकेला नकार

ABOUT THE AUTHOR

...view details