ठाणे Eknath Shinde Thane Speech : " महाराष्ट्र देशाचे पॉवर हाऊस होईल इतकी क्षमता महाराष्ट्रात असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. त्या अनुषंगानं सरकार बदलल्यावर अनेक इंडस्ट्री आल्या आहे. सहा महिन्यात महाराष्ट्र नंबर 1 वर आहे, ही मोठी उपलब्धी आहे. हे सर्व गेमचेंजर प्रकल्प असून महाराष्ट्र जीडीपीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. पायाभूत सुविधांमध्येही महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे," असे प्रतिपादन मुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. शनिवारी (21 सप्टेंबर) ठाणे-मुंबई महानगर विकास परिषद 2024 ठाण्यात पार पडली. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
काय म्हणाले एकनाथ शिंदे? : ठाणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी उपलब्ध साधनसामग्रीचा कल्पकतेनं वापर करुन नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती शिंदेंनी दिली. तसंच पुढं ते म्हणाले, "पालघरला तिसरा एअरपोर्ट करत आहोत. वाढवण बंदर होत असल्यामुळं दावोसमध्ये 1 लाख 37 हजार कोटींचे एमओयू साइन केलं. तर गेल्या दोन महिन्यात दोन लाख कोटींचे एमओयू साईन केलेत. धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाण्याच्या विकासाला आधार दिला. त्यांच्या जिल्ह्यात इतकी मोठी कॉन्फरन्स आयोजित केल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद."
विकासाच्या कामामध्ये आम्ही स्पीड ब्रेकर लावणारे नाही : पुढं विरोधकांवर टोलेबाजी करत शिंदे म्हणाले की, "मुंबई गोवा ॲक्सेस कंट्रोल रस्ता आपण करत आहोत. विकासाच्या कामामध्ये आम्ही स्पीड ब्रेकर लावणारे नाही. तर स्पीड ब्रेकर काढणारे आहोत. 15 वर्षे आंदोलन करून आपण क्लस्टर मंजूर केले. आता एसआरएचे रखडलेले प्रकल्प सुरू करणार आहोत. कोणाला वाटलंही नव्हतं की क्लस्टर होईल. काहींना वाटलं की क्लस्टर हे फक्त स्वप्न आहे. पण आता त्यांना कळतंय."