मुंबई Eknath Shinde : महाबळेश्वर तालुक्यातील 'दरे' हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मूळ गाव. ते अनेकदा या गावाला भेट देत असतात. शिंदे सध्या दरे गावातील यात्रेनिमित्त तेथे गेले आहेत. या दरम्यान त्यांनी शेतातील आपला एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. यासोबतच त्यांनी प्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांची एक कविताही शेअर केली आहे.
शांता शेळकेंची कविता शेअर केली : आपल्या या पोस्टमध्ये एकनाथ शिंदे यांनी लिहिलं की, "गावातील मातीचा सुगंध मला शेतीकडे आणि माझ्या जन्मभूमीकडे खेचून आणतो. जेव्हा-जेव्हा मी माझ्या गावी येतो तेव्हा-तेव्हा माझे पाय आपोआप शेतीकडे वळतात. यावेळी शेतीकाम करून एक अलौकिक आनंद मिळाला". एकनाथ शिंदे यांनी शेतात काम करतानाचे आपले फोटो शेअर केले आहेत. यासह त्यांनी शांता शेळकेंची कविता पोस्ट केली. "हे एक झाड आहे याचे माझे नाते.. वाऱ्याची एक झुळूक दोघांवरूनी जाते.. मला आवडतो याच्या फुलांचा वास.. वासामधुनी उमटणारे जाणीव ओले भास..", ही शांता शेळकेंची कविता मुख्यमंत्र्यांनी शेअर केली आहे.
शेतात फळझाडं आणि भाजीपाल्याची लागवड : एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शेतात लावलेल्या विविध फळांचे आणि भाजीपाल्यांचे फोटोही शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं की, "माझ्या दरे या गावी मी औषधी हळद, स्ट्रॉबेरी, आंबे, काजू, चिकू, बटाटा, सफरचंद, अव्हॅकॅडो, अगरवूड अशी विविध प्रकारची फळझाडे आणि भाजीपाला यांची लागवड केली आहे. शेतीत रमताना एक वेगळाच आनंद मिळतो. थोड्या वेळासाठी का होईना पण अन्य सर्व बाबी बाजूला राहतात. गावाकडची माणसं यांच्याशी असलेलं नातं याचं आयुष्यात एक वेगळं महत्त्व असतं. त्यामुळेच या ठिकाणी येऊन शेती केल्यावर एक वेगळाच आनंद मिळतो, असं एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं.
गावच्या यात्रेसाठी आले : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे येथे गावच्या यात्रेसाठी आले आहेत. मंगळवारी सायंकाळी त्यांचं आगमन झालं. यावेळी ग्रामस्थांनी त्यांचं ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केलं. मुख्यमंत्री झाल्यानंतर ते दुसऱ्यांदा आपल्या मूळ गावी आले आहेत.
हे वाचलंत का :
- मुख्यमंत्री दोन दिवसासांठी मूळ गावी, गावकऱ्यांकडून जंगी स्वागत; दौऱ्याचं कारण काय?