मुंबईCM Eknath Shinde: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज चैत्यभूमी स्मारक येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त राज्यातील जनतेला खूप शुभेच्छा देतो. बाबासाहेबांनी आयुष्यभर दलितांना न्याय देण्यासाठी संघर्ष केला. त्यांनी लिहिलेले संविधान जगात सर्वश्रेष्ठ आहे. जगात बाबासाहेबांचे संविधान वाचले जात आहे. तसेच बाबासाहेबांच्या संविधानावरच आमचे सरकार स्थापन केले आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मुंबईतील चैत्यभूमी स्मारक येथे बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री मंगलप्रभात लोढाही उपस्थित होते.
बाबासाहेबांचे काम प्रत्येकाच्या हृदयामध्ये :पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, बाबासाहेबांचे काम हे प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. तसेच केंद्र किंवा राज्य सरकारने बाबासाहेबांच्या आठवणी कायम जपल्या आहेत. दादरमधील बाबासाहेबांचे वास्तव्याचे घर असेल, लंडनमधील घर असेल, बाबासाहेबांचे इंदू मिलचे स्मारक असेल किंवा दीक्षाभूमी असेल. येथील सर्व ठिकाणांना मोदीजींनी स्मारकांमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय घेतलाय. राज्य सरकार जगाला हेवा वाटावा, असं भव्य दिव्य स्मारक इंदू मिलमध्ये तयार करतंय. त्याचबरोबर आज बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. मला वाटतं बाबासाहेबांचा संविधान दिन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 जून 2015 साली सुरू केला. तो बाबासाहेबांचा संविधान दिन देखील आपण साजरा करतोय, असं मुख्यमंत्री म्हणाले.
जब तक सुरज चॉंद रहेंगा :दरवेळेला निवडणुका आल्या की, विरोधक संविधान बदलणार, संविधान बदलणार अशा प्रकारची ओरड करून या ठिकाणी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात. परंतु मोदींनी त्यांच्या भाषणात म्हटलयं की, बाबासाहेबांच्या संविधानावरच आमच्या देशाचा कारभार सुरू आहे आणि म्हणून संविधान बदलण्याची कुणाची हिम्मत नाही. 'जब तक सूरज चॉंद रहेगा, बाबासाहेब का संविधान कायम रहेगा' असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे या सर्व खोट्यानाट्या आरोपांमध्ये लोकांनी विचलित होण्याची आवश्यकता नाही. खरं म्हणजे बाबासाहेबांचा निवडणुकीत पराभव करण्याचं काम काँग्रेसनं केलं. त्यामुळे या काँग्रेसला किंबहुना विरोधी पक्षाला बाबासाहेबांवर, संविधानावर बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याची टीका यावेळी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस आणि विरोधकांवर केली.