मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्य वाहन चालकांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतलाय. मुंबईतील प्रवेश करण्यासाठी असलेल्या मार्गांवरील पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी देण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात घोषणा करण्यात आली. आज (14 ऑक्टोबर) रात्री बारा वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य सरकारनं केलेली ही घोषणा मास्टरस्ट्रोक मानला जातोय.
वाहतूकदारांना मोठा दिलासा : राज्य मंत्रिमंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे सकाळी साडेनऊ वाजल्यापासून सुरू आहे. या बैठकीत अनेक निर्णय होण्याची शक्यता आहे. परंतु, या बैठकीत एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. तो म्हणजे मुंबईतील प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यावर आता हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोलमाफी देण्यात आलीय. यामध्ये वाशी, मुलुंड पूर्व-पश्चिम, ऐरोली, दहीसर या टोलनाक्यांचा समावेश आहे. या निर्णयामुळं वाहतूकदारांना मोठा दिलासा मिळणार असल्याचं बोललं जातंय.