छत्रपती संभाजीनगर CM Eknath Shinde On Agra Fort: गड किल्याचे संवर्धन करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून प्रतापगड संवर्धन करण्यासाठी पन्नास कोटी रुपयांचा प्रस्ताव दोन दिवसात मंजूर करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आग्रा येथे केली. महाराजांमुळे आज देशाचा इतिहास भूगोल चांगला आहे. आज महाराजांची जयंती देशात नाही तर विदेशात महाराजांची जयंती साजरी केली जात आहे आणि ही अभिमानाची गोष्ट आहे. येणाऱ्या काळात महाराजांची जयंती जगभरात उत्साहात साजरी होईल असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा ३९४ व्या जन्ममहोत्सव सोहळात ते बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्ममहोत्सव साजरा: नागरीकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात आगरा किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्ममहोत्सव संपन्न झाला. अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठाणतर्फे या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. सलग दुसऱ्या वर्षी आगरा येथे या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आगरा येथील सुटकेचा प्रसंग लेझर शोद्वारे दाखवण्यात आला. पाळणा, पोवाडे आणि शिवाजी राजांवर आधारित गाण्याचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पुरातत्व विभागानं परवानगी देण्यास अनेक अडचणी आणल्या अशी खंत आयोजक विनोद पाटील यांनी व्यक्त केलीय. यावेळी सोहळास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री एस पी सिंग बघेल, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज आणि खासदार उदयन राजे भोसले, मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शेकडोंच्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.
उत्सवासाठी सजला लाल किल्ला : शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी लाल किल्ला सजला होता. सोहळ्यासाठी लाल किल्ल्यात २४ बाय ६० फुटाचे खास व्यासपीठ, लाल कार्पेट, आकर्षक सजावट करण्यात आली होती. प्रवेद्वारापासून ते मंचापर्यंत रेड कार्पेट टाकण्यात आलं होतं. लाल किल्ला १ हजार दिव्यांनी उजळवण्यात आला होता. किल्ल्याचं आकर्षण पाहून पर्यटक भारावून गेले होते. विदेशी पर्यटकांनीही सहभागी होत कॅमेरात हे क्षण टिपलं. लाल किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर ढोल, ताशांच्या गजरात सोहळ्याला सुरुवात झाली होती. सजवलेले घोडे, सजीव देखावे, घोड्यांवर मावळ्यांच्या वेशभूषेत बसलेले शालेय विद्यार्थी यांनी लक्ष वेधलं होतं. यावेळी शिवभक्तांनी ढोल ताशांच्या गजरावर ठेका धरला होता. जय जिजाऊ, जय शिवराय अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता. सोहळ्यात 'लेझर शो'नं आकर्षण वाढवलं होतं. आग्राहून सुटका या घटनाक्रमावर 'लेझर शो'च्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला होता. या कलात्मक अविष्काराला उपस्थितांनी जयघोषात दाद दिली. यासह संगीत सोहळा, शिवजन्म पाळणा, पारंपारिक कला प्रदर्शन याचं सादरीकरण करण्यात आलं.
आग्रा किल्ला कायम खुला असावा : अजिंठा वेरुळ लेणीमध्ये जगभरातील लोक येतात. मात्र महाराजांच्या जयंतीसाठी आगरा येथे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. लाल किल्ल्यात येण्यासाठी बंदी का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीसाठी हा किल्ला नेहमीसाठी खुल करावा अशी मागणी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं करावी अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलीय. सुरत, आग्रा अशा अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली गेली पाहिजे, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलीय.