कोल्हापूर CM Eknath Shinde :राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी रोमच्या धर्तीवर संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह (Keshavrao Bhosale Theatre) भक्कमपणे उभारलं होतं. हे नाट्यगृह कोल्हापुरातील ऐतिहासिक नाट्यगृह आहे. या नाट्यगृहाशी कलाकार, रसिक आणि कोल्हापुरकरांचं जिव्हाळ्याचं नातं होतं. या भावनांचा विचार करून हे नाट्यगृह लवकरात लवकर उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. या ऐतिहासिक नाट्यगृहासाठी शासनाकडून 20 कोटींची आर्थिक मदत देण्याची घोषणा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरात केली. यावेळी त्यांनी आगीत नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली.
अजित पवारांनी केली केशवराव नाट्यगृहाची पाहणी :गुरुवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत कोल्हापूरचं सांस्कृतिक वैभव असलेलं केशवराव भोसले नाट्यगृह जळून खाक झालं. यानंतर शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त नाट्यगृहाची पाहणी करून 20 कोटींचा निधी जाहीर केला होता. यानंतर आज कोल्हापूर दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केशवराव भोसले नाट्यगृहात जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी अमोल येडगे उपस्थित होते.
शासनाकडून 20 कोटींची आर्थिक मदत: यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, "8 ऑगस्ट रोजी केशवराव भोसले नाट्यगृह आगीत जळून खाक झालं ही अतिशय दुर्देवी घटना आहे. हे नाट्यगृह पुन्हा उभे करण्यासाठी महानगरपालिकेने तयार केलेल्या आराखड्यानुसार 25 कोटी रूपयांची गरज आहे. नाट्यगृहाचा विमा 5 कोटींचा होता. उर्वरीत रक्कम शासनाकडून दिली जाईल". यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश आबीटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित तसेच विविध विभागांचे अधिकारी, स्थानिक कलाकार उपस्थित होते.
कलाकारांशी साधला संवाद :यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "नाट्यगृहे अनेक असतात पण काही नाट्यगृहांशी कलावंत आणि श्रोत्यांचं जिव्हाळ्याचं नातं असतं. जसं कोल्हापूर वासियांच्या या नाट्यगृहाशी भावना जोडल्या आहेत. त्याप्रमाणे आमच्याही भावना जोडल्या गेल्या आहेत. अनेक कलावंताची मागणी आहे की, हे नाट्यगृह जसं पूर्वी होतं तसंच पुन्हा उभं राहावं. मदतीसाठी मला फोन, मेसेजेस आले. शासन हे सर्वसामान्यांना न्याय देणारं".