छत्रपती संभाजीनगर Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा सायंकाळी पाच वाजता थांबणार आहे. मात्र, त्यापूर्वीच दोन शिवसेना आपापसात भिडल्याचं चित्र क्रांती चौक इथं पाहायला मिळालं. एकीकडं मशाल तर दुसरीकडं धनुष्यबाण अशी रॅली निघाली. एकाच ठिकाणहून रॅली निघत असताना कार्यकर्ते आपापसात भिडले. पोलिसांना दोन्ही गटाला बाजूला करताना नाकीनऊ आले. त्यात दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी मात्र वाद सोडवण्यापेक्षा बघ्याचीच भूमिका अधिक घेतल्याचं दिसून आलं. त्यामुळे एकाच कुटुंबातील दोन गटात किती द्वेष निर्माण झालाय, हे या निमित्तानं पाहायला मिळालं.
उबाठा गटाचे कार्यकर्ते झाले आक्रमक :उबाठा गटातर्फे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ क्रांती चौक इथून रॅली काढण्यात आली. त्याचवेळी शिंदे गट शिवसेना उमेदवार संदिपान भुमरे यांची देखील रॅली क्रांती चौक इथूनच काढण्यात येणार होती. एकीकडं धनुष्यबाण तर एकीकडं मशालीचे झेंडे फडकावत जोरदार घोषणाबाजी कार्यकर्ते करत होते. उबाठा गटाकडून गद्दार - गद्दार, दारू - दारू अशी घोषणाही करण्यात आली. त्यावेळी शिंदे गट शिवसेना जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना दम दिला. त्यामुळे वाद वाढला आणि कार्यकर्ते आपापसात भिडले, अशी माहिती कार्यकर्त्यांनी दिली.
नेत्यांनी घेतली बघ्याची भूमिका :शिवसेना पक्ष फुटल्यानंतर स्थानिकचे आमदार संदिपान भुमरे, प्रदीप जयस्वाल, संजय शिरसाट, अब्दुल सत्तार यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर स्थानिक नेते यांचे कार्यकर्ते आणि आमदारांचे कार्यकर्ते असा वेगळाच राग काही दिवसात पाहिला मिळत आहे. त्याचाच प्रत्यय क्रांतीचौक भागात दिसला. कार्यकर्ते आपापसात भिडले असताना नेते मात्र बघ्यांची भूमिका निभावत होते. त्याचवेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हातात दारूच्या दोन बाटल्या घेत घुमरे यांच्या व्यवसायाबाबत खिजवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वाद वाढला, एकाच वेळी दोन वेगवेगळ्या विरोधी पक्षांना पोलिसांनी परवानगी दिली कशी, असा प्रश्न आता निर्माण होत आहे.
मुद्दाम केलेला प्रकार होता का? :सदरील वाद मुद्दाम करण्यात आला का? असा आरोप एमआयएम पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांनी केला. एकाच वेळी दोन्ही गट समोर आले की आणले गेले, असा आरोप त्यांनी केला. राजकारण खालच्या स्तरावर जात आहे, असं इम्तियाज जलील यावेळी म्हणाले.
हेही वाचा :
- मोदींनी उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या 'त्या' वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापलं, विरोधकांकडून संतप्त प्रतिक्रिया - Lok Sabha Election
- मोदींनी मला डोळा मारला, पण...; उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर घणाघाती टीका - lok sabha election
- नकली शिवसेना मतांसाठी बॉम्बस्फोटातील आरोपीला खांद्यावर घेऊन नाचते; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल - Lok Sabha Election 2024