लातूर Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर राज्यभरात ठिकठिकाणी रास्तारोको आंदोलन सुरु आहे. लातूर शहरातील पीव्हीआर चौकात मराठा आंदोलकांनी रास्तारोको आंदोलन केलं. दरम्यान, परीक्षार्थी, विद्यार्थांना या आंदोलनाचा त्रास सहन करावा लागला. यावेळी लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि मराठा आंदोलकांमध्ये चांगलाच वाद झाला.
"तुम्ही 12 वी पास केलीय का?" : मराठा आंदोलकांनी लातूरच्या पोलीस प्रशासनाला रास्तारोको आंदोलन कुठं आणि कधी करणार? याचं रितसर लेखी निवेदन दिलं असताना परीक्षार्थी विद्यार्थ्यांचं कारण सांगत पोलीस प्रशासन हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला आहे. सध्या राज्यात 12वी बोर्डाची परीक्षा सुरु आहे. विद्यार्थी पेपर द्यायला परीक्षा केंद्रावर वेळेवर जात होते. रस्त्यावर रास्तारोको आंदोलन सुरु राहीलं, तर विद्यार्थ्यांचा खोळंबा होतोय असं सांगत पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी "तुम्ही 12 वी पास केलीय का?" असा प्रश्न आंदोलकांना केला. त्यावेळी "आम्ही विद्यार्थांना अडवत नाही. आम्हाला विद्यार्थी दाखवा आम्ही त्यांची परीक्षा केंद्रावर जाण्यास मदत करतो," असं आंदोलकांनी सांगितले.
आंदोलन दडपण्याचा प्रयत्न : यावेळी अनेक मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यावेळी लातूर शहरातील बार्शी रोडवरील पीव्हीआर चौकात मराठा आंदोलक आक्रमक झाल्यानं तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी आंदोलकांमध्ये आणि पोलिसांमध्ये मोठ्या प्रमाणात झटापट झाली. विद्यार्थ्यांना रस्ता देण्याचं कारण पुढं करत आंदोलकांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप यावेळी केला.
गावागावात मराठा बांधवांनी रास्ता रोको आंदोलन करावं : राज्य सरकारनं सगेसोयरे अधिसूचनेचं कायद्यात रुपांतर करावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. शनिवारपासून म्हणजे आजपासून (दि. 24 फेब्रुवारी) रोजी गावागावात मराठा बांधवांनी रास्ता रोको आंदोलन करावं, असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे. त्याला अनेक ठिकाणी प्रतिसाद मिळाल्याचं चित्र आहे.