कोल्हापूर :महाराष्ट्राच्या राजकारणात '50 खोके एकदम ओके' वाक्यानं जनसामान्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. आता कोल्हापुरात 25 खोक्यांच्या किमतीचा 'आमदार' पाहण्यासाठी भीमा कृषी प्रदर्शनात तुडुंब गर्दी झाली आहे. त्याचं नाव 'आमदार', वय अवघं 4 वर्ष, वजन तब्बल दीड टन, देशात कुठंही फिरण्यासाठी एसी वाहनाची खास सोय. मुऱ्हा जातीच्या या रेड्याला महिन्याकाठी एक लाखांचा नुसता खुराकचं लागतो. भरभक्कम शरीरयष्टी, देखणं रूप आणि 25 कोटी किंमत यामुळं हे जनावर नेमकं आहे तरी कसं? हे पाहण्यासाठी कोल्हापूरकरांची अक्षरशः रीघ लागली आहे.
जगातील सर्वात उंच रेडा :राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्यामार्फत गेली 17 वर्ष कोल्हापुरातील मेरी वेदर मैदानावर भीमा कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येतं. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन विकसित झालेली बी-बियाणं तसंच पाळीव पशुपक्षी हे या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण असतात. यंदा या कृषी प्रदर्शनात हरियाणातील पानिपत जिल्ह्यातील नरेंद्र सिंह यांचा 'आमदार' रेडा प्रमुख आकर्षण ठरत आहे. "या रेड्याचं वजन 1500 किलो असून त्याची लांबी 14 फूट आहे. तर, साडेपाच फूट उंची असल्यामुळं 'आमदार'चे पालनकर्ते नरेंद्र सिंह यांनी हा जगातील सर्वात उंच रेडा असल्याचा दावा केला आहे. या रेड्याच्या देखरेखीसाठी दोघांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, आठवड्याला माणसांप्रमाणं आमदार या रेड्याची हजामत केली जाते. देशभरात होणाऱ्या विविध कृषी प्रदर्शनात आमदार रेड्याचं खास आकर्षण असतं. आत्तापर्यंत या आमदारानं तब्बल सातवेळा राष्ट्रीय चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला आहे. कमी वयात सर्वात उंच असल्यामुळं जगातील सर्वात उंच रेडा असल्याचा दावा पद्मश्री नरेंद्र सिंह यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केला.