महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

होरा म्हणजे काय? नागपूरच्या 'गुगल बॉय'कडं मिळेल प्रत्येक प्रश्नाचं उत्तर - CHILDREN’S DAY 2024

आज (14 नोव्हेंबर) सर्वत्र मोठ्या उत्साहात 'बालदिन' (Childrens Day 2024) साजरा केला जातोय. या पार्श्वभूमीवर आपण भेटूया नागपूरच्या 'गुगल बॉय' अनिशला.

Childrens Day 2024  Special, Nagpur six and half year old google boy Anish Khedkar gives information about what is hora
अनिश खेडकर (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 14, 2024, 3:03 PM IST

नागपूर : ज्या वयात मुलांना धड लिहिता, वाचता येत नाही, त्या वयात एक साडेसहा वर्षाचा चिमुकला चक्क 'होरा चक्रा'चा अभ्यास करतोय. या चिमुकल्या मुलानं सोमवार ते रविवार या सात दिवसाचे वार कसे तयार झाले? त्यात किती होरे असतात? होरा म्हणजे काय? यासह अनेक विषयांचा अगदी सखोल अभ्यास केलाय. हा चिमुकला दुसरा तिसरा कुणीही नसून नागपूरचा 'गुगल बॉय' अनिश अनुपम खेडकर आहे. अनिशला स्पेस सायन्स, रॉकेट, जेट फ्लाईट, हेलिकॉप्टर यासह जगातील अनेक देशांच्या चलनांची माहिती आहे.

अनिश 2 वर्षांचा असताना नागपूरला आजीकडं राहायला आला होता. अनिशचे वडील अनुपम यांना नोकरीच्या निमित्तानं शहर बदलावं लागतं असल्यानं अनिशची आई कल्याणी खेडकर काही काळासाठी आईकडं नागपूरला राहायला आल्या. सुरुवातीला अनिश नुकताचं चालायला आणि बोलायला शिकत असताना तो अंतराळच्या चित्रांमध्ये रमायचा. अवघ्या दोन वर्षांच्या अबोल बालकाची अंतराळातील आवड थक्क करणारी होती. येथून अनिशच्या असामान्य बुद्धीमत्तेला आकार देण्याचा प्रवास सुरू झाला.

गुगल बॉय अनिश खेडकर याची मुलाखत (ETV Bharat Reporter)

अनिशनं केला होरा चक्राचा अभ्यास : असं म्हणतात की 'होरा चक्र'हे ज्योतिष शास्त्राचा प्रमुख भाग आहे. या होरा चक्राचा अभ्यास अनिशनं सुरू केला. यातून त्याला दिवस कसे तयार झाले? वार कसे तयार झाले? त्यात किती होरे असतात? त्यांची भूमिका काय असते? या सर्वांची पूर्ण माहिती मिळाली. आज अनिश या विषयात इतका पारंगत झालाय की भविष्यात तो नक्कीच 'अ‍ॅस्ट्रोनॉमर' म्हणून जगभरात प्रसिद्ध होईल, असा विश्वास ज्योतिषाचार्य आणि होराचक्र अभ्यासक डॉ. भुपेश गाडगे यांनी व्यक्त केलाय.

होरा म्हणजे काय? : 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधताना अनिशनं होराचक्राची माहिती दिली. त्यानं सांगितलं की, 'अहोरात्र' या संस्कृत शब्दापासून 'होरा' हा शब्द तयार झाला. अह:+रात्र=अहोरात्र. संस्कृतमध्ये अहः म्हणजे सूर्योदयापासूनचा काळ आणि रात्र म्हणजे सूर्यास्तानंतरचा काळ. एका सूर्योद‌यापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंतच्या काळाला 1 अहोरात्र किंवा 1 संपूर्ण दिवसरात्र असं म्हणतात. एका अहोरात्रचे एकूण 24 भाग केले, तर त्याच्या एका भागाला 1 'होरा' असं म्हणतात. 'होरा' या शब्दापासूनच 'Hour' हा इंग्रजी शब्द तयार झालाय असं तो सांगतो. 1 होरा=1 तास=1 Hour

होराचक्र कोणत्या काळात तयार केले गेले? : होरापासूनच तासाची उत्पत्ती झाली. खरं तर आर्यभट्टच्या नावानं होराचक्र सुरू झालं असं गृहीत धरलं जातं. पण त्या आधी ऋग्वेदकाळात म्हणजे आजपासून 15 ते 20 हजार वर्षांपूर्वी सुद्धा 'वार' संकल्पनेचा उगम आहे. साधारण 20 हजार वर्षांपूर्वी हे वार चक्र वापरलं जात होतं. पण प्रामुख्यानं आर्यभट्ट यांनी या वार चक्राला लोकांपुढं मांडलं, असं डॉ. भूपेश गाडगे यांनी सांगितलं.

होराचक्र म्हणजेच वारचक्र कसे तयार झाले :'आ मंन्दात शिघ्र पर्यन्तम् होरेश:' या संस्कृत श्लोकानुसार आकाशात उघड्या डोळ्यांनी दिसणारे उपग्रह (शनी, गुरु, मंगळ, शुक्र, बुध) आणि सूर्य, चंद्र जे 'फिरतान' म्हणजे आपली जागा बदलतात. यांच्या भ्रमणकाळानुसार जर मंद गतीनं फिरणाऱ्यापासून ते शिघ्र गतीनं फिरणाऱ्यापर्यंत क्रम लावला तर शनी, गुरू, मंगळ, सूर्य, शुक्र, बुध, चंद्र असा क्रम लागतो. शनीचा भ्रमणकाळ 29 वर्ष असतो, तर गुरुचा भ्रमणकाळ 12 वर्ष असतो. मंगळचा भ्रमणकाळ 1 वर्ष 88 दिवस असतो. रवीचा भ्रमणकाळ हा 1 वर्ष, शुक्राचा भ्रमण काळ 225, बुधचा भ्रमण काळ 88 आहे. याशिवाय चंद्रचा भ्रमण काळ 27 दिवस असतो, अशी माहिती अनिशनं दिली.

'या' विषयावर केलाय सखोल अभ्यास : अनिशला स्पेस सायन्समध्ये सर्वाधिक रस असून अंतराळाशी संबंधित 500 तथ्यांची त्याला माहिती आहे. तसंच त्याला जगातील 195 देशांची राजधानी तोंडपाठ असून नकाशावर देखील तो कोणता देश कुठय? कोणत्या खंडात आहे? याची माहिती सांगतो. जागतिक 50 स्मारकांचीही त्याला माहिती आहे. तर भारतातील राज्यं आणि त्यांच्या राजधानीबद्दल तर विचारायलाच नको, 150 कारचे लोगोही तो ओळखतो. जागतिक चलनाच्या बाबतीतील त्याचं ज्ञान तर थक्क करणारं आहे. याशिवाय रॉकेट, जेट फायटर, फायटर हेलिकॉप्टर आणि मंगळयान, चंद्रयान, गगनयान, आदित्य L1 बद्दलही त्याच्याकडं माहिती आहे.

हेही वाचा -

  1. 'सपनों की उडान'! डाउन सिंड्रोमनं ग्रस्त इंदूरच्या अवनीश तिवारीला मिळणार पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार
  2. नागपूरचा 'गुगल बॉय' : सहा वर्षीय अनिश खेडकर म्हणजे चलता-फिरता विकिपीडिया, देतो अनेक प्रश्नांची अचूक उत्तरं - Nagpur Google Boy

ABOUT THE AUTHOR

...view details