मुंबई Cm Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध महत्वाकांक्षी योजनांबाबत आढावा बैठक घेतली. सरकारच्या योजना राबवल्या जातात की नाही? याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. या बैठकीस उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अल्पसंख्यांक विकास मंत्री अब्दुल सत्तार, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, मुख्यमंत्री सचिवालयाचे प्रधान सल्लागार मनोज सौनिक आणि मुख्य सचिव सुजाता सौनिक, आदी उपस्थित होते.
लाडक्या बहिणींची फसवणूक करणाऱ्यांवर दाखल करा गुन्हा :"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण या योजनेत नोंदणी करताना कुठंही महिला-भगिनींची फसवणूक होता कामा नये. महिला भगिनींकडून अर्ज भरण्यासाठी पैशांची मागणी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा. त्यांचं केवळ निलंबन करुन थांबू नका, तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. त्यांना तुरुंगात पाठवा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना दिले. या योजनेत महिला भगिनींना कुणीही नाडता काम नये, किंवा दलाल फसवणूक करत असतील, तर याकडं जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे. नोंदणीचा सातत्यानं आढावा घेतला जाणं आवश्यक आहे. विशेष म्हणजे फक्त शासकीय केंद्रावर भरले जाणारे अर्जच पडताळणीसाठी ग्राह्य धरले जातील. अशा सूचना देण्याचे निर्देश देण्यात आले. महत्त्वाचं म्हणजे या योजेनेत महिला भगिनींचे आधार नंबर आणि बँक खात्यांची माहिती काळजीपूर्वक आणि अचूक भरली जाईल, याकडं लक्ष देण्यात यावे" असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.