नवी दिल्लीLok Sabha Election 2024 :राज्याच्या महायुतीतील जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी दिल्लीत दाखल झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी शुक्रवारी सायंकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. अमित शाह यांच्यासोबत महायुतीच्या जागा वाटपावर तब्बल दोन तास खल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजपाच्या जागा वाटपाबाबत तडजोड झाल्यास महाराष्ट्रातील उमेदवारांचा भाजपाच्या पुढील यादीत समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महायुतीत नाराजीच्या रंगल्या चर्चा : दोन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर होते. तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी स्वतंत्र चर्चा केली होती. मात्र, या चर्चेनंतरही भाजपानं देऊ केलेल्या लोकसभेच्या जागांवर शिंदे, पवार दोघंही नाराज असल्याचं बोललं जात आहे. अमित शाह यांच्यासोबतच्या चर्चेच्या पहिल्या फेरीत भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं महायुतीच्या तिन्ही नेत्यांना दिल्लीत बोलावलं होतं. त्यामुळं शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत गेले होते.
भाजपाच्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब :भाजपानं बुधवारी दिल्लीत झालेल्या कोअर ग्रूपच्या बैठकीत महाराष्ट्रातील संभाव्य उमेदवारांच्या निवडीबाबत चर्चा केली. महायुतीतील जागा वाटपाचा प्रश्न न सुटल्यानं भाजपानं अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीला भेट दिल्यानंतर केंद्रीय निवडणूक समितीची बैठक घेतल्यानंतर राज्यातील भाजपाच्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यासाठी समितीच्या बैठकीपूर्वी महायुतीतील जागा वाटपाबाबत एकमत होण्यासाठी भाजपाचे केंद्रीय नेते प्रयत्नशील आहेत.
- पवार गटानं लोकसभा निवडणुकीसाठी नऊ पेक्षा जास्त जागांची मागणी केल्याचं सांगितलं जातं. मात्र, भाजपा लोकसभेसाठी अजित पवारांना हवी असलेली जागा देण्यास तयार नसल्याची चर्चा आहे.
- शिंदे गटानंही 13 जागांची मागणी केली असली तरी, भाजपा 10 पेक्षा जास्त जागा देण्याच्या बाजूनं दिसतं नाही. शिवाय रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड, संभाजीनगर, ठाणे अशा काही मतदार संघांवर शिंदे गटानं, तसंच भाजपानं दावा केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जागा वाटपाचा गुंता वाढला आहे.
अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची बैठक : शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे तिन्ही नेते दिल्लीत दाखल झाले. रात्री आठनंतर शिंदे, फडणवीस यांचं दिल्लीत आगमन झालं. मात्र, रात्री साडेदहाच्या सुमारास अमित शाह यांच्यासोबतची बैठक सुरू झाली. या बैठकीला सुनील तटकरे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. अमित शाह यांच्या भेटीपूर्वी अजित पवार यांनी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली.
हे वाचंलत का :
- "गल्लीतील नेत्यानं...", नितीन गडकरींना उद्धव ठाकरेंनी दिलेल्या ऑफरवर फडणवीसांचं उत्तर
- काँग्रेसनं लोकसभेसाठी 39 उमेदवारांची पहिली यादी केली जाहीर; राहुल गांधी वायनाडमधूनच रिंगणात
- आमदार रोहित पवारांना ईडीचा झटका; कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त, पवार म्हणाले, "भाजपात जायचं का?"