नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. त्यांनी विस्तारीकरणाच्या कामाची पाहणी करुन सुरू असलेल्या विकास कामांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी संजय राऊत आणि महाविकास आघाडीची पार लक्तरं काढली. संजय राऊत यांच्याबाबत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना प्रश्न विचारला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत रिकामटेकडे आहेत, मला खूप कामं आहेत. राज्य प्रगतीपथावर नेणं हे आमचं ध्येय आहे, अशी जोरदार टीका त्यांनी केली. महाविकास आघाडी तुटली किंवा जोडली गेली, याच्याशी आम्हाला काही देणंघेणं नाही, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
नागपुरातील सरकारी रुग्णालयाची केली पाहणी :"नागपूरचे दोन्ही मेयो आणि मेडिकल महाविद्यालय हे महाराष्ट्रातील सर्वात जुने मेडिकल कॉलेजेस आहेत. दोन्ही मेडिकल कॉलेजच्या इमारतीला अनेक दशक झाले आहेत. त्यामुळे सर्व इमारती अध्ययावत करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी एक हजार कोटींचा निधी दिला. दोन्ही ठिकाणी कामाची प्रगती पाहण्यासाठी मी आलो होतो. दोन्ही ठिकाणी काम सुरू असून प्रगतीपथावर आहे. गती वाढवण्याची आवश्यकता आहे. काही त्रुटी आढळल्या, त्या दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. निधीची कमतरता आम्ही पडू देणार नाही. काम दर्जेदार झालं पाहिजे, अशी अपेक्षा आहे. मी पुन्हा एप्रिल महिन्यामध्ये आढावा घेणार आहे," असं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणाले.