मुंबई Shiv Jayanti 2024 : काश्मिरमधील कुपवाडा येथील भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वत्र बर्फाच्छादित वातावरण, उणे तापमानात सैन्यदलाच्या जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय सैन्यातील जवानांचे अभिनंदन करीत त्यांचं कौतुक केलं. हिमवर्षावात देखील काश्मीर खोऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जय घोष दुमदुमला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते झालं होतं पुतळ्याचं अनावरण :गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. आज याठिकाणी मराठा बटालियनच्या जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी सलामी दिली. कुपवाडा येथे उणे तापमानात हा अनोखा कार्यक्रम पार पडला. सभोवताली सर्वत्र बर्फ अशा कठीण परिस्थितीतही आपल्या जवानांनी महाराजांना जयंती दिनी केलेलं अभिवादन पाहून अभिमान वाटल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांना प्रेरणादायी, उर्जादायी ठरेल, तसंच त्यांचं मनोबल उंचावत राहील, असं मुख्यमंत्री शिंदे पुतळा अनावरण समारंभात म्हणाले होते. त्याची प्रचिती आज प्रत्यक्षात दिसून आली.