छत्रपती संभाजीराजे शाहू महाराजांविषयी बोलताना कोल्हापूरChhatrapati SambhajiRaje:कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे; मात्र अनेकजण शाहू महाराजांच्या वयाबद्दल विचारत आहेत. यावरून छत्रपती संभाजीराजेंनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वय किती आहे? असा प्रश्न उपस्थित करून विरोधकांची बोलतीच बंद केली. कोल्हापूर लोकसभेच्या रणांगणात वडील श्रीमंत शाहू महाराजांसाठी एक हजार टक्के कष्ट करणार असल्याचा निर्धार स्वराज पक्षाचे संस्थापक आणि माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी बोलून दाखवला. कोल्हापुरात ते पत्रकारांशी बोलत होते.
शाहू महाराज अभ्यासू व्यक्तिमत्त्व :माजी खासदार संभाजीराजे म्हणाले, "शाहू महाराज एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहेत. माझ्या निवडणुकीत त्यांनी 100 टक्के काम केलं असल्यानं मी त्यांच्या प्रचारात 110 टक्के काम करणार. जो निर्णय महाराज घेतील त्यांच्याबरोबर मी आणि माझे सर्व कार्यकर्ते राहणार आहे. निवडणुकीचा शेवटचा टप्पा पूर्ण होईपर्यंत आमचं काम थांबणार नाही. कष्ट करण्यात आम्ही कुठंही कमी पडणार नाही. शाहू महाराजांसोबत मालोजीराजे आणि मी एकत्रितपणे या निवडणुकीत उतरणार आहोत. कोल्हापूर हे नेहमी वेगळी दिशा देणारं शहर आहे. कोल्हापूरची निवडणूक आमच्यासाठी महत्त्वाची आहे. कोल्हापूरकरांची आणि शाहू महाराजांची इच्छा आम्ही सगळे मिळून पूर्ण करू. त्यासाठी आम्ही पूर्ण क्षमतेनं काम करत आहोत."
पंतप्रधान मोदींच्या वयावर प्रश्नचिन्ह :"शाहू महाराज हे आमच्यासाठी सर्वस्व आहेत. घर किती एकसंघ आहे मी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोवरून लक्षात आलं असेल. शाहू महाराज यांचे वय विचारता मग पंतप्रधान मोदी यांचे वय काय आहे? असा प्रतिप्रश्न संभाजीराजेंनी महायुतीच्या नेत्यांना उद्देशून विचारला. शाहू महाराज याचवेळी निवडणुकीच्या रिंगणात का उतरलेत याचा त्यांनी विचार केला असेल. ते कोल्हापूर मतदार संघात पूर्ण क्षमतेनं फिरतील. श्रीमंत शाहू महाराज पैलवान आहेत. आजही त्यांचा खूप प्रवास असतो. कोल्हापूर जिल्ह्याचा विकास कसा करता येईल याचा विचार आम्ही करत आहे," असं संभाजीराजे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
स्वराज पक्ष लोकसभा लढणार नाही :"राज्यभरात स्वराज्य पक्षाचे हजारो कार्यकर्ते आहेत. नाशिकसह कोल्हापूर लोकसभा लढवण्याची इच्छा मी व्यक्त केली होती; मात्र आता माझे वडील श्रीमंत शाहू महाराज कोल्हापूर लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत स्वराज्य पक्ष उतरणार नसल्याची माहिती", पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
हेही वाचा :
- माझी जात न बघता पक्षाने मला उमेदवारी दिली; हंसराज अहीर यांचं सूचक वक्तव्य कुणासाठी?
- गोखले पूल आणि बर्फीवाला पूल जोडण्याचं काम, मुंबई महापालिका मात्र झाली ट्रोल; वाचा सविस्तर
- जेवढ्या जागा शिंदेंच्या शिवसेनेला तितक्या जागा राष्ट्रवादीला द्या; छगन भुजबळ यांची मागणी