छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाडा नेहमीच दुष्काळाच्या सावटाखाली राहिलेला भाग म्हणून ओळखला जातो. यावर्षी देखील अनेक गावांमधे भीषण पाण टंचाई पाहायला मिळाली. विभागात जवळजवळ 2 हजारांहून अधिक टँकरद्वारे पाणी पुरवठा केला गेला. मात्र, कन्नड तालुक्यातील हस्ता गावात कमी पर्जन्यमान होऊनही मुबलक पाणीसाठा आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये नाबार्डच्या माध्यमातून केलेल्या विविध उपाययोजनांमुळं लाखो लिटर पाणी जमिनीत मुरले. त्यामुळं डोंगरावर असलेल्या या गावाची पाणीपातळी आता जवळपास दीड मीटर इतकी वाढली आहे.
हस्ता गावानं पाणी टंचाईवर केली मात (Source reporter) नऊ लाख लिटर पाणी मुरले : कन्नड तालुक्यातील हस्ता गावाची एकेकाळी दुष्काळी भाग म्हणून ओळख होती. 2012 नंतर आलेल्या दुष्काळात गावातील विहिरी अधिग्रहण कराव्या लागतं होत्या. तर शेतात घेण्यात येणाऱ्या पिकांनादेखील मर्यादा होत्या. नाबार्डच्या माध्यमातून 2019 मध्ये जलसंधारणाच्या कामांना सुरुवात करण्यात आली. प्रायोगिक तत्त्वावर 100 हेक्टर जमिनीवर प्रयोग सुरू करण्यात आला. काही दिवसांमध्ये तिथली पाणी पातळी वाढल्याचं निदर्शनास आल्यानं 970 हेक्टर जमिनीवर पूर्णपणे उपाययोजना सुरू करण्यात आल्या. गावातून पावसाचं वाहून जाणारं पाणी वाया जाणार नाही, यासाठी वेगवेगळे प्रयोग सुरू करण्यात आले. त्यात आसपासच्या डोंगराळ भागातून पाणी खाली पडल्यावर ते जमिनीत मुरावे याकरिता पायथ्याशी खड्डे करण्यात आले. परिसरातील पाणी-माती वाहून जाऊ नये, यासाठी नदीपात्रात छोटे बंधारे, दगडी बंधरा तयार करण्यात आले. चार वर्षात त्याचा परिणाम दिसला. "2019 अगोदर जमिनीची पाणी पातळी 1.40 मीटर होती. तर आता 2024 मध्ये 2.50 मीटर पाणी पातळी म्हणजे 1 मीटरने पाणी पातळी वाढली, अशी माहिती नाबार्डचे जिल्हा प्रबंधक सुरेश पटवेकर यांनी दिली.
गावात चारसूत्री कार्यक्रम :कुठलीही उपाययोजना करायचं म्हटलं तर ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांचा सहभाग महत्वाचा असतो. हस्ता गावातील नागरिकांनी 2019 मध्ये अंजना गाव विकास समिती निर्माण केली. गावाच्या कामात गावकऱ्यांचा 16% सहभाग आवश्यक असल्याचं नाबार्डतर्फे सांगण्यात आलं. त्यात श्रमदान समाविष्ट आहे. यंत्रणांचा वापर न करता मनुष्यबळ वापरून काम केलं. प्रत्येकाला चार दिवस श्रमदान अनिवार्य ठेवण्यात आलं. तसंच 1 कोटी 43 लाख 92 हजार 181 नाबार्डतर्फे देण्यात आले. तर गावकऱ्यांनी श्रमदान आणि इतर माध्यमातून 28 लाखांचा सहभाग दिला. हे करत असताना चारसूत्री कार्यक्रम आखण्यात आला. यामध्ये गावात बोअर घेण्यास बंदी घालण्यात आली. पाण्याचा उपसा विहिरीतून केला जाईल असं सांगण्यात आलं. "झाडं तोडण्यास बंदी घालण्यात आली. तर वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात केली जात आहे," असे माजी सरपंच मनोहर निळ यांनी सांगितलं.
पिकांमध्ये वाढ : यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधत असताना लुपिन वेलफेअर कंपनीचे अधिकारी बाळासाहेब गरजे म्हणाले की, "गावकऱ्यांचा सहभाग आणि सरकारी यंत्रणा काम करत असताना खासगी कंपन्यांचा सामाजिक निधी त्यासाठी मदत म्हणून घेतला जातो. हस्ता गावातदेखील लुपिन कंपनीचा सामाजिक निधी म्हणजे सी. एस. आर फंड काही प्रमाणात घेण्यात आला. त्यातून मागील चार वर्षांत अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. 171 हेक्टर परिसरातील डोंगरातून वाहून जाणारे पाणी अडवण्यात आले. त्याचा 1070 हेक्टरवर परिणाम झाला. त्यामुळंच गावातील अंजना नदीला उन्हाळ्यातही पाणी आहे."
हेही वाचा -
- मेळघाटातील 'मडकी' रिकामी! हंडाभर पाण्यासाठी गावकऱ्यांची वणवण - Amravati Water Scarcity
- पाणीटंचाईची तीव्रता वाढली, राज्यातील दहा हजार गावे आणि वाड्यांवर टँकरने पाणी पुरवठा - Water Scarcity Increased
- मुंबईकरांनो पाणी जपून वापरा...! पालिकेच्या धरणांमध्ये उरलाय फक्त 49 टक्के पाणीसाठा