छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Dispute Between Two Groups :छत्रपती संभाजीनगरमधील पडेगाव येथे सोमवारी (22 जानेवारी) दुपारीपतंग आणण्यावरून झालेल्या वादात दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. यावेळी पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी अश्रू धुरांच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. याप्रकरणी 64 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयीत असलेल्या 50 जणांना कोंबिंग ऑपरेशन करून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसंच याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.
वादाचं कारण काय :सोमवारी (22 जानेवारी) एका अकरा वर्षीय मुलाला मारहाण केल्यानं हा वाद सुरू झाला. मिळालेल्या माहितीनुसार हा मुलगा कटलेला पतंग आणण्यासाठी गेला असता काहीजणांनी त्याला बेदम मारहाण केली. याचा जाब विचारण्यासाठी मुलाची आई आणि आजी गेली असता, त्यांना देखील मारहाण करण्यात आली. हा वाद वाढत गेला आणि पडेगाव परिसरातील कादंबरी दर्गा परिसरात दोन गटांमध्ये मारामारी सुरू झाली. जवळपास एक तास दोन्ही गटाकडून दगडफेक करण्यात आली. यामध्ये पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.