नाशिक-नागपूर येथील विधानभवनात काल मंत्रिमंडळाचा विस्ताराचा कार्यक्रम पार पडलाय, यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नऊ जणांना मंत्रिपदाची संधी दिली, परंतु यात छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला डावलण्यात आलंय. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केलीय. भुजबळांसारख्या ओबीसी नेत्याला मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने भुजबळ समर्थक आक्रमक झालेत.
छगन भुजबळ हे अत्यंत आक्रमक शैलीचे नेते :महायुती सरकारमध्ये मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार समजले जाणारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे हेवीवेट नेते छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळ विस्तारात समावेश झाला नसल्याने भुजबळ समर्थक प्रचंड नाराज झालेत. छगन भुजबळ यांना डावलल्याबाबत कोणतेही कारण देण्यात आले नसल्याने याबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. छगन भुजबळ हे अत्यंत आक्रमक शैलीचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. मंडल आयोगाच्या मुद्द्यावरून त्यांनी शिवसेना सोडली आणि काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ओबीसी समाजासाठी त्यांनी समता परिषदेच्या माध्यमातून देशपातळीवर लढा उभा केला. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय करू नये ही त्यांची भूमिका महायुतीला बऱ्यापैकी कामाची ठरली. सरकारमध्ये मंत्रिपदावर असताना मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना थेट आव्हान देत भुजबळांनी अंगावर घेतलं. त्यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये, अशी भूमिका घेतली होती. असं असताना छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भुजबळ समर्थक संतप्त झालेत.
भुजबळांना डावलल्यानं अनेक तर्कवितर्क :छगन भुजबळ यांनी लोकसभेला महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध भूमिका घेतल्याचे म्हटले जाते. ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षणाला विरोध केला. नांदगाव विधानसभेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे उमेदवार सुहास कांदे यांच्याविरुद्ध छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी बंडखोरी केली, त्याला छगन भुजबळ यांनी उघड पाठबळ दिले. तसेच नाशिकच्या पालकमंत्रिपदी भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांना नियुक्त करण्यावरूनही पेच निर्माण होऊ शकतो, हा संभाव्य पेच टाळण्यासाठी भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान दिले नसावे, असं काहींचं म्हणणं आहे.
भुजबळ समर्थकांकडून सरकारचा निषेध : छगन भुजबळ यांचे नाव मंत्रिमंडळात नसणे हा भुजबळ समर्थकांसह संपूर्ण नाशिक जिल्ह्यासाठी धक्का होता. सहाजिकच त्याचे पडसाद उमटले, भुजबळ समर्थकांकडून मुंबई नाका परिसरातील राष्ट्रवादी कार्यालयासमोर टायर जाळून निषेध नोंदवण्यात आला. तसेच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत महायुती सरकारचा निषेध केला. तसेच भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातदेखील भुजबळ समर्थकांनी ठिकठिकाणी रास्ता रोको करत सरकारचा निषेध केला. आम्ही या संदर्भात अजित पवार यांना आम्ही भेटणार असून, नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी छगन भुजबळ यांना मंत्रिपद द्यावे, असं निवेदन करणार आहोत, ते आमच्या विनंतीला मान देतील आणि भुजबळांना मंत्रिपद देतील, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष अंबादास खैरे यांनी म्हटलंय.
होय मी नाराज :नागपूरमध्ये छगन भुजबळांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत, होय मी नाराज झालोय, मी सामान्य कार्यकर्ता आहे, मला डावललं काय, फेकलं काय, फरक काय पडतोय, मंत्रिपद किती वेळा आले आणि गेले. छगन भुजबळ संपला नाही, ज्यांनी डावललं त्यांना विचारायला हवं. मला अजित पवारांशी बोलण्याची गरज वाटली नाही. माझ्या मतदारसंघातील लोक आणि समता परिषदेचे कार्यकर्ते त्यांच्याशी मी बोलणार आहे. मराठा समाजचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना अंगावर घेतल्याचं बक्षीस मिळालं, अशी खंत त्यांनी व्यक्त करत त्यांनी नाशिक जातं असल्याचं म्हटलंय.