महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माझ्या उमेदवारीचा निर्णय थेट दिल्लीतून; छगन भुजबळांकडून नाशिकच्या उमेदवारीचे संकेत - Lok Sabha Elections - LOK SABHA ELECTIONS

LOK SABHA ELECTIONS : नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीतील उमेदवाराबाबत दावे प्रतिदावे सुरू आहेत. याबाबत अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमधून उमेदवारीचे संकेत दिले आहेत. तसंच विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी मलाच उमेदवारी मिळणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

LOK SABHA ELECTIONS
छगन भुजबळ

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 30, 2024, 7:59 PM IST

छगन भुजबळ, हेमंत गोडसे यांची प्रतिक्रिया

नाशिकLOK SABHA ELECTIONS :नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीतील उमेदवाराबाबत सस्पेन्स आजही कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष तसंच शिवसेनेच्या शिंदे गटाकडून जागा मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, यातच अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी उमेदवारीचे संकेत दिले आहेत.

नाशिकच्या जागेसंदर्भातील निर्णय दिल्लीत :शिवसेनेच्या शिंदे गटाकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना मुंबईतून रिकाम्या हाती परतावं लागलंय. दोन दिवसात नाशिकच्या जागेबाबत निर्णय होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केलीय. दुसरीकडं नाशिकच्या जागेसंदर्भातील निर्णय दिल्लीत होणार असल्याची चर्चा आहे. असं असलं तरी सद्य परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं पारडं जड दिसत आहे. दोन दिवसात नाशिकच्या जागेसंदर्भात निश्चिती होऊन उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.



गोडसे यांची उमेदवारी अडचणीत :नाशिक मतदारसंघातून अजित पवार गटाचे नेते तसंच अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांना उमेदवारी देण्याच्या सूचना भाजपाच्या वरिष्ठ स्तरावरील नेत्यांनी केल्या आहेत. वरिष्ठ स्तरावर झालेल्या या निर्णयात राज्यस्तरावरील नेत्यांना बदल करणं अशक्य असल्याचं बोललं जातय. त्यामुळं उमेदवारीचा हा गुंता मोठा झाला आहे. दरम्यान, आजच उमेदवारीची घोषणा अपेक्षित होती. मात्र, आता घोषणा काही काळासाठी लांबली आहे. यामुळं महायुतीच्या तिन्ही पक्षांत तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळं विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी अडचणीत आली आहे.

छगन भुजबळांची चाचपणी : गेल्या चार दिवसांपासून मुंबईमध्ये तळ ठोकून असलेले गोडसे यांनी शुक्रवारी विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा करून नाशिकमध्ये परतण्याचा निर्णय घेतला. शिंदे यांनी आता उमेदवारी संदर्भात दिल्लीतून निर्णय होईल, असं स्पष्ट केलं असून आपल्या बाजूनं निर्णय होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर गोडसे यांनी आज शहरातील हनुमान मंदिरात महाआरतीच्या माध्यमातून निवडणूक रिंगणामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडं राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अद्याप आशा कायम ठेवली आहे. तसंच भाजपानं देखील पुन्हा ही जागा आपल्याकडं खेचण्याचे डावपेच सुरू केले आहे. यासंदर्भात वरिष्ठांच्या गाठीभेटींवर जोर दिला आहे.



दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ :नाशिकच्या जागेवरून शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असं शीतयुद्ध विकोपाला गेलं आहे. विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्याप्रमाणे छगन भुजबळ यांच्यासाठी देखील ही जागा प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्यामुळं दोघांच्या भांडण तिसऱ्याचा लाभ होणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळं या ठिकाणी नवीन चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, ही जागा भाजपाला सुटावी, अशी मागणी भाजपा पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

भाजपाच्या वरिष्ठांकडून भुजबळांची शिफारस : सलग 10 वर्ष नाशिक लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडं आहे. अशात माजी खासदार हेमंत गोडसे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानं भाजपा-राष्ट्रवादीकडून नाशिक लोकसभा मतदारसंघावर दावा करण्यात येत आहे. त्यामुळं शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी अडचणीत आली आहे. अशातच काही दिवसापूर्वी मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत नाशिक लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा केल्याचं बोललं जातंय. दुसरीकडं भारतीय जनता पार्टीकडून देखील नाशिक लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची रीघ लागली आहे. केंद्रात सत्ता स्थापित करण्यासाठी भाजपाला प्रत्येक सीट महत्त्वाची असल्यानं या मतदारसंघातून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी निवडणूक लढवावी, असा आग्रह खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केल्याचं बोललं जातंय. तसंच ही जागा निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवल्याचंही बोललं जात आहे.

या तीन पर्यायाची चर्चा :1) महाविकास आघाडीकडून सिन्नरमधून माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळं राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून भुजबळ यांच्या ऐवजी आमदार माणिकराव कोकाटे यांना संधी देणे. 2) जागा शिवसेना शिंदे गटाकडं ठेवून नवीन चेहरा देणे. तसंच महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याच्या तयारीत असलेले विजय करंजकर यांना गळाला लावल्या जाण्याची शक्यता आहे. 3) नाशिक शहरात महानगरपालिकेची एक हाती सत्ता असलेल्या भाजपाकडं उमेदवारी देणे. या पर्यायांमध्ये नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले, नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

महायुतीचे वरिष्ठ पदाधिकारी निर्णय घेतील : नाशिकच्या जागेसाठी माझा आग्रह नव्हता. महायुतीची चर्चा दिल्लीमध्ये झाली. त्यावेळी अचानक माझं नाव पुढं आलं. नाशिकमध्ये भुजबळांनी उभं राहावं, हे दिल्लीतून ठरलंय. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील मी यावर चर्चा केलीय. फडणवीस यांनी देखील मला उभा राहण्यासाठी सांगितलंय. अचानक नाव पुढं आल्यावर मी काही लोकांशी चर्चा केली. सध्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी नशिक जागेसाठी आग्रह धरला आहे. त्यामुळं जो निर्णय येईल, तो आम्हाला मान्य असेल, असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं.



शिवसेनेलाच मिळणार जागा :मागील दहा वर्षापासून मी नाशिक लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं. अनेक विकासकामं या मतदारसंघात झालीय. सब्र का फल मीठा होता है, त्यामुळं निश्चित तीन-चार दिवसांमध्ये अधिकृत शिवसेनेची यादी जाहीर होईल. तोपर्यंत तुमचा प्रचार आपण सुरू ठेवावा, असं मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं. म्हणून आपण केलेली काम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रचार सुरू केला आहे. ही जागा शिवसेनेला सुटेल, अशी मला खात्री असल्याचं विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितलं.

मराठा आंदोलकांकडून इशारा : मंत्री छगन भुजबळ यांना नाशिकमधून उमेदवारी दिल्यास महायुतीला याची किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्वच्या सर्व 48 मतदारसंघात आम्ही आमचे उमेदवार उभे करू, आमची मराठा समाजाची ताकद दाखवून देऊ, भुजबळ यांनी मराठा समाजाला डीवचण्याचं काम केलंय. त्यामुळं भुजबळांचा पराभव करण्याचा निर्धार मराठा समाजानं केला आहे. सकल मराठा समाजाच्या वतीनं जरांगे पाटील नाशिक मतदार संघात मराठा समाजाचा उमेदवार जाहीर करणार आहे, असं मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर यांनी सांगितल.


हे वाचलंत का :

  1. ...मग एका जागेवरच मैत्रीपूर्ण लढत का? 48 जागांवर मैत्रीपूर्ण लढत होऊ द्या; राऊतांचा काँग्रेसला टोला - Lok Sabha Election 2024
  2. घड्याळ चिन्हावरच नाशिक लोकसभा निवडणूक लढली जाईल - छगन भुजबळ - Lok Sabha elections
  3. नाशिक मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी छगन भुजबळांच्या नावावर दिल्लीतून शिक्कामोर्तब? - Nashik Lok Sabha

ABOUT THE AUTHOR

...view details