चंद्रपूर Bunty Bhangdiya :भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा लोकसभा निवडणुकीत मोठ्या फरकाने पराभव झाला. त्यामुळं आता पक्षांतर्गत विरोधक त्यांना आव्हान देत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. भाजपाचे आमदार बंटी भांगडिया यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूर शहरात सर्वत्र फलक लावण्यात आले. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाचे राष्ट्रीय नेते आणि राज्याच्या प्रमुख नेत्यांचे फोटो लावण्यात आले. एवढंच नव्हे तर फलकावर स्थानिक पदाधिकाऱ्यांचे फोटो देखील लावण्यात आले. मात्र, एकाही फलकावर सुधीर मुनगंटीवार यांचा फोटो तर सोडा साधा उल्लेखही नव्हता. त्यामुळे राजकीय वर्तुळात भाजपामधील अंतर्गत गटबाजीवर जोरदार चर्चा रंगल्या आहेत.
बंटी भांगडिया देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय : सुधीर मुनगंटीवार आणि आमदार बंटी भांगडिया हे एकाच राजकीय पक्षातील नेते असले तरी त्यांच्यात राजकीय सौख्य नसल्याचं अनेकदा दिसून आलं. हे दोन नेते अपवाद वगळता एकाच व्यासपीठावर देखील दिसत नाहीत. सुधीर मुनगंटीवार हे अर्थमंत्री असताना आमदार बंटी भांगडिया यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांवरून सुधीर मुनगंटीवार यांना घेरलं होतं. त्यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी सर्वांसमोर भांगडिया यांची चांगलीच कानउघाडणी केली होती. सत्तेत असताना असलं आंदोलन केल्याबद्दल ते चांगलेच संतापले होते. यानंतर सुधीर मुनगंटीवार आणि बंटी भांगडिया यांच्यातली दरी वाढत गेली. बंटी भांगडिया हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात. त्यांच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस हे आवर्जुन उपस्थित असतात.
फलकावर 'या' नेत्यांच्या फोटोंचा समावेश :19 जुलैला आमदार बंटी भांगडिया यांचा वाढदिवस होता. या निमित्तानं शहरात अनेक ठिकाणी त्यांना शुभेच्छा देणारे फलक लावण्यात आले. शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. फलकावर सर्वात वरच्या भागात भाजपाच्या वरीष्ठ नेत्यांचे फोटो आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या फोटोंचा समावेश आहे. मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा फोटो मात्र यातून वगळण्यात आला आहे. त्यामुळं आता भाजपाच्या अंतर्गत गोटात चर्चांना उधाण आलं आहे.