ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर भिवंडी शहरातील धामणकर नाका जवळ सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बापू सांगळे यांना मे. सीएमएस या कंपनीची रोख रक्कम घेऊन जाणारी गाडी अढळून आली. संबंधीत गाडी चालकास गाडीतील रोख रक्कमेबाबत विचारणा केली असता सदर रोकड ही मे. सीएमएस या कंपनीची असल्याचं नमुद केलं पण रक्कमेबाबत पुरावे तसंच रोख रक्कम हाताळणी क्युआर कोड सादर करता आला नसल्यानं ही रक्कम जप्त करण्यात आली आहे.
निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास भिवंडीतील धामणकर नाका परिसरात वाहन तपासणी अधिकारी हेमंत पष्टे हे तत्काळ सहाय्यक पोलीस आयुक्त पूर्व यांच्या कार्यालयात पथकासह हजर झाले. गाडी क्र. एमएच. ४३/व्हिपी/७९२० मध्ये एकूण २ गार्ड, २ कस्टोडीयन आणि १ चालक असे एकूण ५ इसम होते. नंतर त्यांच्या उपस्थितीत त्या वाहनात असलेल्या बॅगमधील आणि एटीएम मशिनमध्ये भरावयाच्या सिल ट्रे मधील रोख रक्कमेची गणना केली असता त्यामध्ये एकूण रुपये २,३०,१७,६०० रक्कम आढळून आली.