ठाणे Thackeray Group Leader Threat : दोन दिवसात राजकारण सोडून संन्यास घ्या किंवा कल्याण सोडून निघून जा नाहीतर संपवून टाकेन अशी धमकी ठाकरे गटाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने ठाकरे गट सोडून शिंदे गटात गेलेल्या महिला माजी नगरसेविकेसह तिच्या पतीला दिली आहे. या प्रकरणी ठाकरे गटाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यावर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत एकच खळबळ उडाली आहे. हरीचंद्र गौरु हरदास उर्फ बाळा हरदास असे धमकीचा गुन्हा दाखल झालेल्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. तर माजी नगरसेवक विजया पोटे आणि अरविंद पोटे असे शिंदेच्या गटात सामील झालेल्या पदाधिकाऱ्यांची नावे आहेत.
ठाकरे गटाला मोठा धक्का :लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात घेण्याचं काम सर्वच पक्षाकडून होत आहे. अशाच प्रकारे कल्याण पश्चिमेत ठाकरे गटाला मोठा धक्का देत ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका विजया पोटे आणि त्यांचे पती अरविंद पोटे यांही शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. यानंतर माजी नगरसेविका विजया पोटे यांना ठाकरे गटाकडून नेहमीच त्रास होत होता.
मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल :अशातच ६ मे रोजी दुपारच्या सुमारास ठाकरे गटातील ज्येष्ठ पदाधिकारी हरीचंद्र गौरु हरदास उर्फ बाळा हरदास याही शिंदे गटात गेलेल्या माजी नगरसेवक विजया पोटे आणि त्यांचे पती अरविंद पोटे यांना दोन दिवसात राजकारण सोडून संन्यास घ्या किंवा कल्याण सोडून निघून जा. नाहीतर संपवून टाकेन असं सांगत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्या याप्रकरणी विजया पोटे यांचे पती अरविंद पोटे यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला आहे.