पुणे Unauthorized Schools In Pune: विद्येचे माहेरघर तसेच शैक्षणिक राजधानी असलेल्या पुणे जिल्ह्यात 49 शाळा या अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या शाळा इंग्रजी माध्यमांच्या असून पुणे शहर आणि ग्रामीण भागातील ४५ शाळा या बेकायदेशीर आहेत तर ४ शाळा या नियमबाह्य पद्धतीनं चालविल्या जात आहेत. जिल्हा प्रशासनाच्यावतीनं या शाळांवर कारवाई करत जिल्ह्यातील 10 अनधिकृत शाळांवर गुन्हा दाखल तर 29 अनधिकृत शाळा बंद करण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही :पुणे जिल्ह्यात 49 शाळा या अनधिकृत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सर्वेक्षणात समोर आली होती. यानंतर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या शाळांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. यानंतर ज्या शाळांवर कारवाई करत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील तसेच शहरातील 10 शाळांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर 29 शाळा या बंद करण्यात आल्या आहेत. या अनधिकृत शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शेजारच्या शाळेत ट्रान्सफर केले जाणार असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी दिली आहे.
शासकीय परवानगी नसताना वर्ग सुरू :पुण्यातील उंड्री येथील ईरा एज्युकेशन सोसायटीतर्फे संचालित ऑर्किड्स इंटरनॅशनल स्कूलकडे कोणतीही शासनाची परवानगी नसताना इयत्ता पहिली ते दहावीचे अनधिकृत वर्ग चालविले जात होते. या प्रकरणी जिल्हा परिषदेने धडक कारवाई केली असून या स्कूलच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अनधिकृत वर्ग चालविले जाण्या प्रकरणी पिंपरी-चिंचवडनंतर पुणे शहरात गुन्हा दाखल झाल्याची दुसरी घटना घडली. अशा अनधिकृत चालणाऱ्या 10 शाळांवर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.