अमरावती Stone Pelting Case : अंजनगाव (Anjangaon) सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूरच्या (Pandhari Khanampur) स्वागत प्रवेशद्वाराच्या मुद्यावरून विभागीय आयुक्त कार्यालयावर दगडफेक करणाऱ्या 1500 आंदोलकांविरुद्ध विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, 11 जणांची नावे पुढे आली आहेत. अमरावती शहरासह अंजनगाव सुर्जी तालुक्यात शांतता असून, कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुंषगानं पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे. तर फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
अशी आहे घटना : पांढरी खानमपूर येथील स्वागत प्रवेशद्वारावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव असावं, या मागणीसाठी शेकडो आंदोलकांचे 11 मार्च रोजी विभागीय आयुक्त कार्यालयावर आंदोलन केले होते. दरम्यान आंदोलकाचे शिष्ठमंडळ विभागीय आयुक्त यांना भेटणार होते. परंतु आंदोलकातील काही पुरूष आणि महिलांनी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या मुख्य प्रवेशगेटवर चढून जोर-जोराने प्रशासना विरुध्द घोषणाबाजी केली होती. सदर आंदोलकांना शांत राहण्याचं पोलिसांकडून आवाहन करण्यात आलं होतं. तसेच वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनीही आंदोलकांना समजावून सांगण्याचे बरेच प्रयत्न केले. परंतु सायंकाळी आंदोलनातील शिष्ठमंडळ विभागीय आयुक्त यांना भेटुन बाहेर येताच आंदोलकांनी उग्र रूप धारण केलं होतं.
अशी घडली घटना :आंदोलकांनी प्रशासनाविरुध्द घोषणाबाजी करून, हातातील पाण्याच्या बाटल्या फेकण्यास सुरुवात केली होती. दरम्यान काही समाजकंटक आंदोलकांनी पोलीसांच्या दिशेने पाण्याच्या बाटल्या फेकल्या आणि मोठ्या प्रमाणात दगडफेक केली होती. त्यामुळं काही पोलिस जखमी झाले. तर दगडफेकीत शेकडो वाहनांचे नुकसान झाले. त्यामुळं आंदोलनाचे उग्र रूप पाहता सर्वप्रथम अग्निशामक दलाद्वारे पाण्याचा फवारा आंदोलकांवर करण्यात आला. पंरतु आंदोलकांनी पुन्हा हिंसक वळण घेतलं. त्यामुळं आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिस निरीक्षक निलेश करे यांच्या आदेशानं आंदोलकांच्या दिशेने अश्रुधुर फेकण्यात आले. दरम्यान पुन्हा आंदोलक आक्रमक झाले आणि त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं पोलिसांना आंदोलकांवर सौम्य बळाचा वापर करावा लागला. लाठीचार्ज पाहताच आंदोलकांनी तेथून पळ काढला. परंतु या हिंसक आंदोलनात 25 ते 30 पोलिस जखमी झाले आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले.
सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान : या आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीमध्ये अग्निशमन वाहनांसह पोलीस वाहनांचेही मोठं नुकसान झालं आहे. यामध्ये अग्निशमनचे एमएच 27-बीएक्स-6913 वाहन, आरसीपी वाहन क्रमांक एमएच 27 ए 9613, वज्र वाहन क्रमांक एमएच 27 एए 9323, वरूण वाहन क्रमांक एमएच 27 एए 5031, वाहतुक विभागाची दुचाकी क्रमांक एमएच 12 व्हीएस 3084 व इतर अनेक वाहने, खासगी वाहन क्रमांक एमएच 27 डीपी 0729, एमएच 27 डीपी 1711, अशा प्रकारचे वाहने आणि सार्वजनिक मालमत्तेचं अंदाजे 4 ते 5 लाख रूपयांचं नुकसान आंदोलकांनी केलं.