सातारा - कोल्हापुरातील व्यावसायिकाची १ कोटी ४० लाखांची रक्कम पुण्यातून कोल्हापूरला घेऊन जाताना सातारा जिल्ह्यातील पाचवड (ता. वाई) हद्दीत ती अज्ञातांनी लुटल्याचा कार चालकाचा बनाव भुईंज पोलिसांनी तीन तासात उघडकीस आणला. कार चालक आणि कोल्हापूर सीआयडीमधील त्याच्या हवालदार मित्रानेच ही लूट केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी कार चालक नीलेश शिवाजी पाटील (रा. भैरवनाथ मंदिराजवळ, पाचगाव) याला पोलिसांनी अटक केली असून सीआयडी हवालदार अभिजीत शिवाजीराव यादव (रा. पिरवाडी, ता. करवीर) हा रक्कम घेऊन पसार झाला आहे.
कार चालकाने रचला बनाव :कोल्हापुरातील व्यावसायिक मनोज मोहन वाधवानी यांची व्यवसायातील रक्कम पुण्यातून आणण्यासाठी त्यांनी बदली कार चालक नीलेश पाटील याला पुण्याला पाठवले होते. रक्कम घेऊन परत येताना मध्यरात्री एकच्या सुमारास चालकाने वाधवानींना फोन केला. पोलिसांची गाडी माझा पाठलाग करीत आहे. मी काय करू? असं त्याने विचारलं. वाधवानींनी त्याला गाडी बाजूला घेऊन पोलिसांशी बोलायला सांगितलं. पुन्हा पंधरा मिनिटांनी चालकाचा वाधवांनींना फोन आला. घाबरल्यामुळे मी गाडी सोडून पळून गेलो होतो. थोड्या वेळाने परत आल्यानंतर कारमधील १ कोटी ४० लाखांची रक्कम लंपास झाली होती, असं त्यानं सांगितलं.
पोलिसी खाक्या दाखवताच बनाव उघड :व्यावसायिक वाधवानींना या घटनेबद्दल शंका आल्याने त्यांनी चालकाला पोलिस ठाण्यात जायला सांगितलं. ते स्वतः पहाटे भुईंज पोलिस ठाण्यात पोहोचले. कार चालक लुटीची घटना रंगवून सांगत होता. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने सीआयडीमध्ये हवालदार असलेल्या मित्राकडे रक्कम देऊन आपण लुटीचा बनाव केल्याची कबुली दिली. त्यानंतर वाधवानी यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला.