बुलढाणा Buldhana Crime News : बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. एका जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापिकेनं 8 वर्षीय विद्यार्थ्यासोबत गैरवर्तणूक करत विद्यार्थ्याचा लैंगिक छळ झाल्याची तक्रार विद्यार्थ्याच्या वडिलांनी केली. त्यानंतर मुख्यध्यापिकेविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दखल केला आहे. मात्र या घटनेनं शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या नात्याला काळीमा फासला गेलाय.
नेमकं प्रकरण काय : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 मार्चला बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील एका गावातल्या जिल्हा परिषद शाळेत केळी वाटण्यात आली होती. यात पीडित विद्यार्थ्याला काळी पडलेली केळी मिळाली. यानंतर काळी पडलेली केळी का वाटली या मुद्द्यावरुन पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी मुख्याध्यापिकेला जाब विचारला. यावरुन मुख्याध्यापिका आणि विद्यार्थ्याच्या वडिलांमध्ये वाद झाला. या वादानंतर मुख्याध्यापिकेनं पीडित विद्यार्थ्याला दुसऱ्या दिवशी वर्गखोलीत बोलावलं. यानंतर विद्यार्थ्याला "माझी कंप्लेंट वडिलांकडे करतो काय, बदली करायला लावतो काय, थांब तुला दाखवते"असं म्हणत मुख्याध्यापिकेनं विद्यार्थ्यासोबत लैंगिक गैरवर्तणूक करत छळ केल्याचं वडिलांनी दिलेल्या तक्रारीत नमुद करण्यात आलय.