मुंबईBreach Of Privilege Notice :भाजपाचे आमदार राम कदम यांनी विधानसभा अध्यक्षांचा अवमान केल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या विरोधात विधानसभेत विशेष अधिकार भंगाची तक्रार दिली आहे. ही तक्रार तपासून विशेषाधिकार भंग नोटीस दाखल करण्याच्या सूचना तालिकाध्यक्षांनी दिल्या आहेत.
ठाकरे, राऊतांचे वर्तन गावगुंडाप्रमाणे :एखादा गावगुंड ज्या पद्धतीनं चॅलेंज देतो, आव्हान देतो त्या पद्धतीनं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आव्हान दिलं आहे. आमदार अपात्रता प्रकरणी राहुल नार्वेकर यांनी अत्यंत महत्त्वाचा आणि न्यायपूर्ण निकाल दिला आहे. त्या निकालाच्या विरोधात बोलताना त्यांचा अवमान होईल अशी वर्तणूक या दोघांनी केली आहे, असा आरोप राम कदम यांनी केला.
विशेषाधिकारभंगाची तक्रार :संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी नार्वेकरांविरुद्ध अत्यंत खालच्या भाषेचा प्रयोग केला. असे शब्द उच्चारले जे आपण या सभागृहात उच्चारूसुद्धा शकत नाही. हे सर्व शब्दप्रयोग विधानसभा अध्यक्षांचा अवमान करणारे होते. हा केवळ विधानसभा अध्यक्षांचा नाही तर सभागृहात बसलेल्या सर्व सदस्यांचा अपमान आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांचा अवमान करणाऱ्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या विरोधात विधानसभा नियम 273 आणि 274 अन्वये आपण विशेष अधिकार भागाची तक्रार मांडत असल्याचं राम कदम यांनी सांगितलं. यासंदर्भात तालिका अध्यक्षांनी ही तक्रार तपासून त्यानुसार कार्यवाही केली जाईल, असे निर्देश दिले.
नार्वेकरांवर टीका :राहुल नार्वेकर यांना शिवसेनेबाबत आमदार अपात्रतेचा निकाल दिल्यावर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी त्यांच्यावर घणाघाती टीका केली होती. हा निकाल एकांगी असून तो आधीच ठरवण्यात आला होता, असं ते म्हणाले होते. याशिवाय शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह शिंदे गटाकडे गेल्यानंतरही ठाकरे आणि राऊतांनी राहुल नार्वेकर यांच्यावर बोचरी टीका करत पक्षपात केल्याचा आरोप केला होता. यावरून बराच गदारोळसुद्धा झाला होता.
हेही वाचा:
- भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; संविधान भेट देत केली 'ही' मागणी
- नेपोटिझम वादावर चर्चा करणाऱ्या कंगनाला सहा वर्षानंतर गडकरींकडून मिळालं 'समाधानकारक' उत्तर
- चंद्रपूर लोकसभा 2024 : भाजपकडून 'यांची' नावे आहेत चर्चेत