नागपूरBudget 2024 :1 फेब्रुवारीला केंद्र सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार आहे. हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभेच्या निवडणुकीला सामोर जावं लागणार आहे. त्यामुळं ते शेवटच्या अर्थसंकल्पात सामान्य नागरिकांच्या अपेक्षांचा विचार करतील, असं नागरिकांचं म्हणणं आहे. पेट्रोल तसंच डिझेलचे दर सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर आहेत. त्यामुळं देशात महागाई नियंत्रणात आलेली नाही. यावेळी तरी पेट्रोल, डिझेलला जीएसटीच्या कक्षेत केंद्र सरकार आणणार का असा प्रश्न नागपूरकरांनी विचारला आहे. सरकारनं केसापासून तर नखांपर्यंतच्या वस्तू या जीएसटी कक्षेत आणल्या आहेत, मग पेट्रोल, डिझेलसाठीचं काय अडचण आहे. याबाबत केंद्र सरकारनं स्पष्टीकरण द्यायला हवं, असं देखील मत नागरिकांनी व्यक्त केलंय.
महागाईचा आगडोंब : 2019 च्या तुलनेत आज प्रत्येक वस्तूचे दर वाढले आहेत. नागपूरसारख्या महानगरात एक लिटर पेट्रोलची किंमत 107 रुपये आहे, तर डिझेलही शतकाच्या उंबरठ्यावर पोहचलं आहे. पेट्रोल, डिझेलचे दर वाढले असून, त्याचा थेट परिणाम वाहतूक व्यवस्थेवर होत आहे. त्यामुळं प्रत्येक वस्तूचे भाव 20 ते 25 टक्क्यांनी वाढले आहेत. सरकारनं पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणल्यास वस्तूंच्या किंमती कमी होतील, तसंच किराणा, भाजीपाल्याचे दरही खाली येतील, अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.