राहुरी (अहमदनगर) : Ahmednagar Crime: राहुरी न्यायालयात वकिली करणाऱ्या अॅड. राजाराम जयवंत आढाव (वय 52) आणि अॅड. मनिषा आढाव (वय 42) असं या दाम्पत्याचं नाव आहे. हे दोघं गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होते. काल शुक्रवार 26 जानेवारी रोजी सायंकाळी त्यांचे मृतदेह सापडले. राहुरी तालुक्यातील उंबरे येथील स्मशानभूमीमध्ये असणाऱ्या विहिरीमध्ये हे मृतदेह आढळून आले. विहिरीतून दोघांचाही मृतदेह काढण्यात आला असून, पैशाच्या वादातून हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दोन दिवसांपासून बेपत्ता : दोघांनाही दगड बांधून विहिरीत टाकल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली असून, दोघे फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. पक्षकार आणि वकिलांमध्ये फीवरून झालेल्या वादातून हे हत्याकांड झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. हे वकिल दाम्पत्य राहुरी तालुक्यातील मानोरी येथील आढाव वस्ती येथे राहात होते. दोघेही राहुरी येथील न्यायालयात वकिलीचा व्यवसाय करत होते. गुरुवारी दुपारपर्यंत ते न्यायालयात होते. त्यानंतर नगर येथे गेले. तिथून त्यांनी पक्षकाराला पाठवून पत्नी मनिषालाही बोलावून घेतले. तेव्हापासून दोघेही बेपत्ता होते.
नक्की काय घडलं :राहुरी पोलीस पथक आढाव दाम्पत्याचा शोध घेत होते. या दरम्यान जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने डस्टर गाडीचा शोध घेऊन उंबरे येथील किरण तसंच आणखी एक अशा दोन आरोपींना ताब्यात घेतलं. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी खुनाची कबुली दिली. संशयित म्हणून पकडलेले दोघे सराईत गुन्हेगार असल्याने खुनाचा मास्टरमाईंड कोण याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.