जळगाव Nepal Bus Accident : वरणगाव येथील 80 नागरिक हे नेपाळ इथं पर्यटनासाठी गेलेले होते, त्यापैकी 40 नागरिकांची बस काठमांडू इथं शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता दरीत कोसळल्यानं 24 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली. काठमांडू शहराच्या जवळ असलेल्या खैरनी नदीमध्ये बस कोसळून हा अपघात झाला आहे. या प्रकरणातील मृतांचे मृतदेह नेपाळवरुन भारतात आणले जाणार आहेत. 24 भाविकांचा नेपाळमध्ये मृत्यू झाल्यानं केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी नेपाळमध्ये धाव घेतली आहे. त्यांच्यासह भुसावळचे आमदार संजय सावकारे हे देखील काठमांडू इथं पोहोचले आहेत.
भाविकांची बस कोसळली दरीत :जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातून 104 भाविक 10 दिवसांच्या दौऱ्यासाठी दोन दिवसांपूर्वी नेपाळमध्ये दाखल झाला. हे भाविक तीन बसमधून प्रवास करत होते. पहिले दोन दिवस या भाविकांनी पोखराला भेट दिली. शुक्रवारी काठमांडूसाठी रवाना झालेल्या या तीन बसपैकी एक बस मार्स्यांगडी नदीत कोसळली. सशस्त्र पोलीस बल कुरिंतरचे प्रमुख माधव प्रसाद पौडेल यांनी सांगितले की, "या तीनही बसमध्ये बहुसंख्य प्रवासी हे नातेवाईक होते."
भावासोबतच तो व्हिडिओ कॉल ठरला शेवटचा :नेपाळमध्ये ठार झालेल्या भाविकांच्या नातेवाईकांनी सांगितलं की, "आम्ही अपघात होण्याच्या काही वेळा आधीच भावाशी व्हिडिओ कॉलवर चर्चा केली. अयोध्याचं दर्शन झाल्यानंतर ते काठमांडूला जाणार होते. मात्र सकाळी अकराच्या सुमारास आम्हाला तिथून फोन आला आणि अपघात घडल्याची माहिती मिळाली. भावासोबत आमचा तो व्हिडिओ कॉल शेवटचा ठरला, अशी माहिती मृतांच्या नातेवाईकांनी दिली.