महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोविंद पानसरे हत्या प्रकरणी 25 जूनपूर्वी कुटुंबीयांचे अतिरिक्त जबाब नोंदवा, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश - Govind Pansare murder case

Govind Pansare Murder Case : गोविंद पानसरे हत्या प्रकरणी 25 जूनपूर्वी कुटुंबीयांचे अतिरिक्त जबाब नोंदवण्याच्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयानं दिली आहे.

Bombay High Court
मुंबई उच्च न्यायालय, गोविंद पानसरे (ETV BHARAT MH Desk)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 12, 2024, 8:06 PM IST

Updated : Jun 13, 2024, 7:43 PM IST

मुंबईGovind Pansare Murder Case : ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी तपास यंत्रणांनी पानसरे कुटुंबीयांचे अतिरिक्त जबाब 25 जूनपूर्वी नोंदवावे, असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 12 जुलै रोजी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अजय गडकरी तसंच न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर बुधवारी या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयानं पानसरे कुटुंबीयांनी दहशतवादविरोधी पथकासमोर (एटीएस) अतिरिक्त जबाब नोंदवण्याची परवानगी दिली. राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ वकील ॲड. अशोक मुंदरगी यांनी युक्तीवाद केला असून याचिकाकर्त्या पानसरे कुंटुंबियातर्फे ॲड. अभय नेवगी यांनी युक्तिवाद केला.

सूत्रधारांना समोर आणण्यात अपयश :यावेळी ॲड. नेवगी म्हणाले, नरेंद्र दाभोलकर हत्याकांडातील आरोपींना पुणे सत्र न्यायालयानं शिक्षा सुनावली. मात्र, या प्रकरणातील सूत्रधारांना समोर आणण्यात तपास यंत्रणांना अपयश आल्याचं निरिक्षण त्यावेळी न्यायालयानं नोंदवलंय. डॉ. नरेंद्र दाभोलकर तसंच गोविंद पानसरे हत्या प्रकरणात पिस्तूलाचा वापर करण्यात आला. या दोन्ही खून प्रकरणातील आरोपी सनातन संस्थेशी संबंधित असल्याचा मुद्दा वकील नेवगी यांनी उपस्थित करून न्यायालयाचं लक्ष वेधलं. यावेळी त्यांनी दाभोलकर खून खटल्याच्या निकालातील परिच्छेद क्रमांक 108 मधील उतारा न्यायालयासमोर वाचून दाखवला.

तुमच्याकडं असलेली माहिती द्या : गोविंद पानसरे हत्येप्रकरणीही तपास यंत्रणा सूत्रधारांपर्यंत पोहोचू शकलेली नाही, याकडं देखील नवगी यांनी लक्ष वेधलं. या प्रकरणी लवकरच तपास यंत्रणांना अतिरिक्त निवेदन देण्यात येणार आहे. त्या निवेदनातील माहितीची पडताळणी करून तपास यंत्रणांनी त्या मुद्द्यांवर पुढील तपास करावा, अशी मागणी त्यांनी न्यायालयात केलीय. त्यावर उच्च न्यायालयानं 'आम्ही' काय निरीक्षण नोंदवत आहे, यापेक्षा तुमच्याकडं असलेली माहिती थेट तपास यंत्रणांना द्या, असं खंडपीठानं म्हटलं आहे. पानसरे यांच्यावर 16 फेब्रुवारी 2015 रोजी कोल्हापुरात गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यानंतर 20 फेब्रुवारी रोजी त्यांचं निधन झालं होतं. या प्रकरणाचा तपास सुरुवातीला सीआयडीच्या विशेष तपास पथकानं केला होता. मात्र त्यानंतर ऑगस्ट 2022 मध्ये या प्रकरणाचा तपास एटीएसकडं सोपवण्यात आला होता.

'हे' वाचलंत का :

  1. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरण; एटीएसच्या तपासावर उच्च न्यायालयानं व्यक्त केली नाराजी
  2. Pansares Murder Case : पानसरे हत्ये प्रकरणी आरोपी तावडेचा उच्च न्यायालयात जामीन रद्द करण्याची याचिका मागे
  3. Govind Pansare Murder Case : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्यातील आरोपींविरोधात आरोप निश्चितीची प्रक्रिया थांबू नका; कोल्हापूर सत्र न्यायालयाला निर्देश
Last Updated : Jun 13, 2024, 7:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details