मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्यानंतर हॉलीवूडमध्ये प्रचंड शांतता पसरली असल्याचं बोललं जात आहे. बाबा सिद्दीकी आणि बॉलीवूड यांचे संबंध हे सर्वांनाच माहिती आहेत. मात्र, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर बॉलीवूडच्या भाईजानची पाचावर धारण बसल्याचं दिसून येत आहे. याबाबतचा खुलासा खुद्द बाबा सिद्दीकी यांचे चिरंजीव आमदार झिशान सिद्दीकी यांनी केला आहे. भाईजानची अवस्था स्थिर नसल्याचं आमदार झिशान सिद्दीकी यांनी एका माध्यमाला मुलाखत देताना सांगितलं आहे. बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खान याला रात्री नीट झोप लागली नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची सलमान खानशी खास मैत्री होती. त्यांच्या मैत्रीचे किस्से आजही चर्चेचा विषय आहे. सलमानचे शाहरुख खानसोबतचे सबंध बिघडले, तेव्हा बाबा सिद्दीकी यांनीच या दोघांमध्ये मध्यस्थी करुन वाद मिटवला होता, असं म्हटलं जाते.
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर भाईजानला होत आहे त्रास :आमदार झिशान सिद्दीकी यांनी सोमवारी एका माध्यम संस्थेला दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान बाबा सिद्दीकी आणि सलमान खान यांच्याबाबत भाष्य केलं आहे. आमदार झिशान सिद्दीकी यांनी म्हटलं आहे, की "जेव्हापासून वडिलांचे निधन झालं तेव्हापासून सलमान खान सतत कुटुंबाच्या संपर्कात असतो. दररोज रात्री कुटुंबीयांना फोन करतो. सलमान खाननं फोन करुन बाबांच्या मृत्यूनंतर त्रास होत आहे," असं देखील सांगितलं. झिशान यांनी सांगितलं की, "सिद्दीकी कुटुंबाला केवळ सलमानच नाही तर बॉलीवूडमधील इतर अभिनेते आणि अभिनेत्रींनी देखील आधार दिला," असंही झिशान सिद्दिकी यांनी सांगितलं आहे. यामध्ये संजय दत्त आणि शिल्पा शेट्टी यांच्या नावाचाही समावेश आहे.