मुंबईBody Bag Scam Case : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना आज कोविड काळात झालेल्या कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, किशोरी पेडणेकर आज चौकशीसाठी हजर झाल्या नाहीत. त्या ऐवजी त्यांचे वकील ईडी कार्यालयात हजर झाले. किशोरी पेडणेकरांना 30 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याची परवानगी द्यावी अशी, विनंती त्यांच्या वकिलांनी केली आहे.
बॉडी बॅग खरेदी घोटाळा : मात्र, त्यांच्या मुदतवाढीबाबत ईडीच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यापूर्वी 23 नोव्हेंबर रोजी ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांची सहा तास चौकशी केली होती. कोविड काळात मुंबई महापालिकेनं खासगी कंपनीकडून बॉडी बॅग तिप्पट दरानं खरेदी केल्याचा आरोप पेडणेकरांवर करण्यात आला आहे. 4 ऑगस्ट रोजी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या आधारे ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे.
बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल :बॉडी बॅगमधील कथित अनियमिततेची चौकशी करण्यासाठी किशोरी पेडणेकर यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पेडणेकरांहस महापालिकेच्या इतर वरिष्ठ अधिकार्यांवर ऑगस्टमध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम 409, 420, 120 ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंमलबजावणी संचालनालयानं (ED) 7 नोव्हेंबर 2023 रोजी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त वेलरासू यांची कोविड गैरप्रकारांबाबत सुमारे 6 तास चौकशी केली होती. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीनं 8 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र किशोरी पेडणेकर यांच्या वकिलानं ईडी अधिकाऱ्यांकडं चार आठवड्यांची मुदतवाढ मागितली होती.
निविदा प्रक्रियेत पेडणेकरांचा सहभाग :अंमलबजावणी संचालनालयानं मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, माजी अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प), माजी उपमहापालिका आयुक्त (खरेदी/सीपीडी) यांच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. कोरोनाच्या काळात मुंबई महापालिकेत घोटाळा झाल्याचा आरोप पेडणेकर यांच्यावर आहे. कोविड काळात निविदा प्रक्रियेत किशोरी पेडणेकर यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. मुंबईतील कोविड रुग्णांच्या मृतदेहासाठी बॉडी बॅग 2 हजार रुपयांऐवजी 68 हजार रुपयांना विकत घेतल्याचा आरोप आहे.
हे वाचलंत का :
- ठरलं! वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत; पुढील बैठक 30 जानेवारीला
- रवींद्र वायकर यांना ईडीनं धाडलं तिसऱ्यांदा समन्स; 'या' दिवशी होणार चौकशी
- बंधूंना मिळालेल्या ED नोटीसीवरुन संजय राऊत कडाडले, नेमकं काय म्हणाले? वाचा