महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी महानगरपालिकेचं महत्त्वाचं पाऊल, स्मशानभूमीत पर्यावरणपूरक लाकडी दहन यंत्रणांचा होणार वापर - Mumbai Air Pollution - MUMBAI AIR POLLUTION

Air Pollution in Mumbai : मुंबई महानगरपालिकेनं मृतदेहाच्या दहनासाठी स्मशानभूमीत पर्यावरणपूक लाकडी दहन यंत्रणेचा वापर करण्याचा निर्णय घेतलाय. मुंबई शहर आणि दोन्ही उपनगरातील 9 ठिकाणी ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे. पर्यावरणाचा ऱ्हास टाळतानाच वायू प्रदूषण टाळण्यासाठी या पद्धतीचा वापर उपयुक्त ठरणार आहे.

ECO FRIENDLY PYRE CREATION SYSTEM
स्मशानात पर्यावरणपूरक दहन यंत्रणा (Source reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 25, 2024, 10:57 AM IST

मुंबई Air Pollution in Mumbai : मुंबई महानगरपालिकेनं प्रदूषणमुक्तीसाठी महत्वाचं पाऊल उचललंय. स्मशानभूमीच्या ठिकाणी मृतदेहाच्या दहनासाठी आता पर्यावरणपूरक लाकडी दहन यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे. मुंबई शहर आणि पूर्व-पश्चिम उपनगरातील नऊ ठिकाणी हे तंत्रज्ञान पालिकेमार्फत वापरण्यात येणार आहे. त्यामुळं पर्यावरणाची हानी टाळतानाच वायू प्रदूषण टाळण्यासाठी या पद्धतीचा वापर उपयुक्त ठरणार आहे.

'या' ठिकाणी करणार लाकडी दहन यंत्रणेचा वापर : मुंबई शहरात भोईवाडा स्मशानभूमी, गोवारी स्मशानभूमी (वडाळा), वैंकुठधाम स्मशानभूमी (रे रोड) तसंच पूर्व उपनगरामध्ये टागोर नगर स्मशानभूमी (विक्रोळी), देवनार कॉलनी स्मशानभूमी (गोवंडी), अमरधाम पोस्टल कॉलनी (चेंबूर) आणि पश्चिम उपनगरामध्ये बाभाई स्मशानभूमी (बोरिवली), ओशिवरा स्मशानभूमी, शिवधाम स्मशानभूमी (गोरेगाव) आदी नऊ ठिकाणी स्मशानभूमीत पर्यावरणपूरक लाकडी दहन यंत्रणेचा वापर करण्यात येणार असल्याचं पालिकेनं जाहीर केलंय.

सध्या मुंबईतील विविध स्मशानभूमीच्या ठिकाणी लाकडी चिता, विद्युत दाहिनी आणि गॅस शवदाहिनीचा वापर मृतदेहाच्या दहनासाठी करण्यात येतो. सद्यस्थितीत 10 स्मशानभूमींमध्ये विद्युत दाहिनी आणि 18 स्मशानभूमीच्या ठिकाणी गॅस शवदाहिनी बसविली आहे. आता 9 विद्युतदाहिनीच्या ठिकाणी पर्यावरणपूरक लाकडी दहन यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे. या अगोदर 2020 साली शीव येथील स्मशानभूमीत लाकडी दहन यंत्रणेचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आला होता.

प्रदूषणात घट करण्यासाठी मदत :मृतदेहाच्या दहनासाठी लाकडाऐवजी पर्यायी इंधन म्हणून ब्रिकेट्स/पॅलेट्स बायोमासचा वापर करण्यासाठी 14 स्मशानभूमी निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यामुळं पर्यावरणाची हानी टाळतानाच वायू प्रदूषण टाळण्यासाठीही मदत होणार आहे. मृतदेहाच्या दहनासाठी कम्बशन चेंबरचा वापर करण्यात येतो. तसंच दाहिनीच्या भट्टीच्या विशिष्ट रचनेमुळं कमीत कमी लाकडांचा वापर हा दहनाच्या प्रक्रियेत होतो. परिणामी प्रदूषणात घट करण्यासाठी मदत होते.

प्रत्येक मृतदेहाच्या दहनासाठी लागणाऱ्या 350 किलो ते 400 किलो लाकडांच्या तुलनेत पर्यावरणपूरक लाकडी दहन यंत्रणेत 100 ते 125 किलो इतक्या लाकडाचा वापर करण्यात येतो. त्यामुळं सरासरी 250 किलो इतक्या लाकडाची बचत प्रत्येक दहनाच्या प्रक्रियेत होईल. परिणामी कार्बन उर्त्सजनाचं प्रमाणही कमी होण्यासाठी यंत्रणा उपयुक्त आहे. पर्यावरणपूरक आणि वैज्ञानिक पद्धतीवर आधारित अशी अद्ययावत स्वरूपाची लाकडी दहन यंत्रणा जरी तयार करण्यात आलेली असली, तरीही धार्मिक विधींसाठीचा विचारही या संरचनेत करण्यात आलाय. ट्रॉलीच्या बाहेरील बाजूच्या सुविधेमुळं अतिशय सोप्या पद्धतीनं अंत्यविधी करणं शक्य आहे.

ऊर्जा वहनासाठी तसंच कमीत कमी धूर पर्यावरणात चिमणीतून जाईल अशा पद्धतीची रचना दहन यंत्रणेसाठी करण्यात आलीये. विशिष्ट व्यवस्थेमुळं कमीत कमी धूर निर्माण होतो. वॉटर स्क्रबर आणि सायक्लोनिक सेपरेटरमध्ये वायू प्रदूषकांमधील कण आणि विषारी वायू काढून टाकले जातात. या प्रक्रियेनंतर निर्माण झालेली हवा 30 मीटर उंच चिमणीमधून हवेत सोडली जाते. मुंबईतील 9 ठिकाणी या यंत्रणेच्या अंमलबजावणीनंतर सध्याचे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी मोठी मदत मिळणार असल्याचं पालिका प्रशासनानं म्हटलंय.

ABOUT THE AUTHOR

...view details