मुंबईBMC Property Tax Issue : सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा मालमत्ता करभरणा करण्याचा अंतिम देय दिनांक शनिवार २५ मे २०२४ आहे. या मुदतीत करभरणा न करणाऱ्या मालमत्ताधारकांच्या थकीत करावर दरमहा २ टक्के दंड आकारला जाईल असा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. (BMC civilian Convenience Center) करभरणा करण्याचा अंतिम देय दिनांकापर्यंतचा कालावधी लक्षात घेता नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी महानगरपालिकेकडून गुरुवार, दिनांक २३ आणि शुक्रवार, दिनांक २४ मे २०२४ रोजी सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत तसेच शनिवार, दिनांक २५ मे २०२४ रोजी सकाळी ८ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत नागरी सुविधा केंद्रे सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Property Tax Mumbai)
तर दरमहा 2 टक्के दंड :मुंबईकरांनी पालिका प्रशासनाने दिलेल्या मुदतीत आपल्या मालमत्ता कराची रक्कम भरावी आणि दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई टाळावी, असं आवाहन पालिका प्रशासनाकडून मुंबईकरांना करण्यात आलं आहे. अंतिम देय दिनांक जवळ येऊनही अद्यापही करभरणा न केलेल्या मालमत्ताधारकांकडे तीन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. अशा मालमत्ताधारकांनी दिनांक २५ मे २०२४ रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत करभरणा न केल्यास त्यानंतर त्यांच्या थकीत करावर दरमहा २ टक्के दंड आकारण्यात येणार आहे.