छत्रपती संभाजीनगर : "राज्यात विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या, या दरम्यान रक्तदानाची मोहीम मंदावली. परिणामी थैलेसीमियाग्रस्त मुलांवर त्याचा परिणाम झालाय. शासकीय वैद्यकीय रुग्णालय म्हणजेच घाटी रक्त केंद्र तर्फे सामाजिक संघटना, पोलीस, राज्य राखीव दल, सैन्य यांना रक्तदान करण्याचं आवाहन करण्यात आलय. त्यामुळं काहीसा तुटवडा भरून काढण्यात यश आलं असून लवकरच पुरवठा सुरळीत होईल अशी माहिती", डॉ. भरत सूर्यवंशी यांनी दिली.
थैलेसीमिया रुग्णांचे हाल : "थैलेसीमिया हा आजार रक्त घटकांशी आधारित आहे. या आजाराशी संबंधित रुग्णांमध्ये रक्त तयार होण्यास अडचणी असतात. त्यामुळं त्यांना बाहेरून रक्त देण्याची गरज पडते. या रुग्णांच्या रक्तातील पेशी लवकर मृत पावतात. अशावेळी रक्त तयार करण्याचे घटक आवश्यक असतात. शरीराची वाढ होत नाही, हिमोग्लोबिन कमी होतं, परिणामी रक्ताची गरज भासते. मात्र, रुग्णांना वारंवार रक्त दिल्यास रक्तातील लोह इतर अवयवांमध्ये जाऊन बसतात. त्यामुळं शरीरातील अवयव निकामी होण्याचा धोका अधिक असतो. या आजारात अल्फा आणि बीटा थालेसिमिया असे दोन प्रकार असतात. त्यातील अल्फा प्रकार कमी हानिकारक असतो तर बीटा हा अधिक त्रासदायक असतो. साधारणतः रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण 6 पेक्षा कमी झाल्यावर रक्त द्यावेच लागते. काही रुग्णांना महिन्यातून दोनवेळा तर काहींना तीनवेळा देखील दीडशे ते दोनशे एमएल रक्त द्यावं लागतं." असं डॉ. सूर्यवंशी यांनी स्पष्ट केलं. तसंच सण आणि निवडणुका यामुळं रक्त संकलानावर परिणाम झाल्याची माहिती, डॉ. भरत सूर्यवंशी यांनी दिली.