अतुल भातखळकर महायुतीच्या जागा वाटपाविषयी बोलताना मुंबई :मुंबई दौऱ्यावर असलेले भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेत तब्बल १ तास चर्चा केली. या भेटीत राज्यातील त्याचप्रमाणे मुंबईतील सध्याची राजकीय परिस्थिती, जागावाटप तसेच उमेदवार निवडीवरून होणारे मतभेद याचा फटका महायुतीला बसू नये म्हणून एक प्रस्ताव नड्डा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्याची चर्चा आहे. हा प्रस्ताव असा आहे की, सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे मतदार संघात संभ्रमाचे वातावरण आहे. त्या ठिकाणी उमेदवार हा महायुती पुरस्कृत दिला जाऊन तो भाजपाच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढवेल. यामुळे त्या उमेदवारास जिंकून येण्यास जास्त मदत होईल, अशा पद्धतीचा हा प्रस्ताव आहे.
हलगर्जीपणा भाजपाला भारी:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी भाजपाने कंबर कसली असली तरी संसदेचा रस्ता हा उत्तर प्रदेश आणि त्यानंतर महाराष्ट्रातून जातो, हे नक्की आहे. उत्तर प्रदेशमध्ये खासदारकीच्या ८० जागा असून त्या पाठोपाठ महाराष्ट्रात ४८ जागा आहेत. अशा परिस्थितीमध्ये ही दोन राज्य मोदींसाठी फार महत्त्वाची आहेत. महाराष्ट्रात भाजपाचे २३, शिवसेना शिंदे गटाचे १३, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ५, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ३, राष्ट्रवादी अजित पवार गटाचा १, एमआयएमचा १, अपक्ष १, तर काँग्रेसचा १ असे खासदार आहेत.
राज्यातील राजकीय चित्र अस्थिर:महाराष्ट्रात अगोदर एकनाथ शिंदे त्यानंतर अजित पवार यांनी केलेल्या पक्ष फोडीच्या राजकारणानंतर महाराष्ट्रातील जनतेचा कौल कुणाच्या बाजूने असेल? याबाबत भाजपाच्या मनात किंबहुना महायुतीत संभ्रमाचे वातावरण आहे. २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे १८ खासदार निवडून आले होते. त्यापैकी १३ खासदार हे एकनाथ शिंदे सोबत गेल्यानं उद्धव ठाकरे यांच्याकडे ५ खासदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ खासदार निवडून आले होते. अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार यांच्याकडे ३ खासदार असून अजित पवार गटाकडे १ खासदार आहे. या सर्व परिस्थितीत जागा वाटपाचा तिढाही अद्याप कायम आहे. अगोदरच राज्यात झालेले नाट्यमय सत्तांतर, त्यानंतर इतर पक्षातून भाजपामध्ये आयात केलेले नेते, पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या नेत्यांसह कार्यकर्त्यांवर भाजपाकडून होत असलेला अन्याय या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय चित्र अस्थिर झालं आहे. असं असलं तरी जागा वाटपाबाबत राज्यातील महायुतीचे वरिष्ठ नेते एकत्र बसून निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया भाजपाचे मुंबईचे आमदार अतुल भातखळकर यांनी दिली आहे.
महायुतीत जागा वाटपावरून खटके:लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागा वाटपावरून खटके उडायला सुरुवात झाली आहे. यंदा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जागा वाटतात भाजपला ३२ जागा, शिवसेनेच्या शिंदे गटाला १२ जागा तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४ जागा भेटणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबत शिंदे गटाचे उत्तर पश्चिम मतदार संघाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही भाजपासोबत असलो तरी भाजपाच्या दावणीला बांधलेलो नाही, अशी रोखठोक प्रतिक्रिया त्यांनी दिली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना २२ जागा लढली. त्यात १८ जागांवर आम्ही विजय संपादन केला. अशा परिस्थितीत यंदा १२ जागा कशा घेणार? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
उमेदवाराची जिंकून येण्याची शाश्वती वाढणार-भाजपानं दिल्या प्रस्तावाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीही सल्लामसलत करणार आहेत. या प्रस्तावाच्या अनुषंगानं सध्याच्या परिस्थितीमध्ये एखाद्या मतदारसंघातील लोकसभेचा उमेदवार हा एकनाथ शिंदे गट किंवा अजित पवार गट यांचा जरी असला तरी हा प्रस्ताव उमेदवारासाठी फायदेशीर ठरणार आहे. याचं कारण म्हणजे दोन गटाच्या वादामध्ये उमेदवार जिंकून येण्याची शक्यता कमी असणार आहे. मात्र, जर भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवली गेली तर अर्थातच भाजपाचं पूर्ण समर्थन त्या उमेदवाराला भेटणार आहे. भाजपाची ताकद ही त्याच्या बाजूनं असणार आहे. अशामध्ये फोडाफोडीचे राजकारण कमी होणार आहे. भाजपाच्या चिन्हावर उभ्या असलेल्या उमेदवाराला निवडून येण्याची शक्यता जास्त असणार आहे. उमेदवार अजित पवार गटाचा असेल किंवा एकनाथ शिंदे गटाचा असेल तरीसुद्धा त्या उमेदवाराला जिंकून येण्याची शाश्वती राहणार आहे.
हेही वाचा:
- पंतप्रधान मोदींच्या लेखणीची किंमत २५ लाख; संजय राऊतांनी साधला पंतप्रधान मोदींवर निशाणा
- मराठा आंदोलनात फूट; मनोज जरांगेंच्या आंदोलनामागं शरद पवारांचं पाठबळ; जरांगेंच्या आणखी एका सहकाऱ्याचा गंभीर आरोप
- काँग्रेस सोलापूर लोकसभेला युवा नेतृत्व प्रणिती शिंदेंना संधी देणार? भाजपानंही केली जय्यत तयारी